Pimpri : तळेगाव नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण लवकरच

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे शहराचे वैभव ठरणारी नगर परिषदेची नवीन इमारत लवकर लोकार्पण करावयाची असल्याने राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी सूचना आमदार सुनील शेळके यांनी नगरपरिषद प्रशासनास केली. गुरुवारी (दि.१२) आमदार सुनील शेळके यांनी तळेगाव नगरपरिषदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेत पाहणी दौरा केला. यावेळी आमदार शेळके बोलत होते.
सुनील शेळके यांनी गुरुवारी तळेगाव शहरातील विविध विकास कामांची माहिती घेतली. सोबत नगरपरिषदेच्या नवीन इमारतीची पाहणी केली. यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, बांधकाम विभाग अभियंता राम सरगर, पाणीपुरवठा अभियंता अभिषेक शिंदे, नगररचना विभाग अभियंता गणेश कोकाटे, तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष संतोष दाभाडे, माजी नगरसेवक सुरेश दाभाडे, इतिहास संशोधक अॅड विनय दाभाडे, विश्वजीत कदम आणि नवीन नगरपरिषद इमारतीच्या विविध विभागात काम करणारे ठेकेदार व नागरिक उपस्थित होते.
तळेगाव शहरातील रस्त्याची कामे बऱ्यापैकी पूर्ण होत आलेली असून नवीन नगरपरिषदेचे काम पूर्ण करून लवकरात लवकर इमारतीचे लोकार्पण करावयाचे आहे, असे आमदार शेळके म्हणाले. तळेगाव नगरपरिषद कार्यालयाचे काम सन २०२२ मध्ये सुरू करण्यात आले. सध्या बांधकाम अंतिम टप्प्यात असून इंटेरियर डिझाईन, लाईट फिटिंग, फायर फायटर, कंपाउंड वॉल, गार्डन आदी कामे सुरू असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस असल्याचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सांगितले.





