तळेगाव नगरपरिषदेच्या सभेत गोंधळ

अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप  : महत्त्वपूर्ण विषयांवर जोरदार चर्चा

चौकशी समिती स्थापन
जेसीबी, पोकलन आणि डंपरच्या सहाय्याने आरोग्य खात्यातील कामांसाठी कोट्यवधी रुपये रुपये खर्ची टाकले असून यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुनील शेळके यांनी केला. उद्यान, आरोग्य, बांधकाम आणि विद्युत या विभागातील जादा दराने आकारलेल्या संशयास्पद बिलांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्याची मागणी शेळके यांनी केली. नगराध्यक्षा जगनाडे यांनी ती मान्य करून चौकशी समिती स्थापन केली. मागील दोन वर्षांतील संशयास्पद बिलांची ही समिती सखोल चौकशी करणार असून अहवाल सादर करणार आहेत.

दिव्यांगांना दोन हजार रुपये “पेन्शन’

फेरीवाला सर्वेक्षणात लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केलेला नाही. फेरीवाला सर्वेक्षण चुकीचे झाल्यास त्यात सर्वेक्षण समितीस जबाबदार धरावे, अशी सूचना संग्राम काकडे यांनी केली. नगरपरिषद हद्दीतील रहिवासी असणाऱ्या दिव्यांगांना 1 हजार रुपयांऐवजी 2 हजार रुपये मासिक पेन्शन योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. स्टेशन भाजी मार्केटसाठी कायमस्वरूपी शेड देण्याबाबतच्या विषयास स्थगिती देण्यात आली. 

तळेगाव दाभाडे – सत्तारूढ भारतीय जनता पक्ष आणि जनसेवा विकास समिती आणि विरोधी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीच्या काही नगरसेवकांनी नगरपरिषदेच्या विविध खात्यातील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेचे आरोप करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या फैरीने सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली.

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद सभागृहात सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. 16) पार पडली. सभेच्या पटलावर एकूण 109 विषय होते. अकरा वाजता सभेला सुरूवात झाली. सुनील शेळके, सुलोचना आवारे, नगरसेवक गणेश खांडगे, अरुण भेगडे, अमोल शेटे, अरुण माने, वैशाली दाभाडे, शोभा भेगडे आदींनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देताना अधिकाऱ्यांची दमछाक झाली. प्रत्यक्ष विषय पत्रिकेवरील विषय सुरू करण्यास दुपारचे एक वाजले. विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा चालू असताना दीडच्या सुमारास काही नगरसेवकांनी सभागृह सोडले. या संधीचा फायदा घेत गणपूर्ती अभावी सभा तहकूब करावी अशी मागणी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे नगरसेवक अरुण माने यांनी केली. त्यामुळे दीड तास सभा तहकूब करीत पुन्हा तीनला सुरू झाली.

तळेगाव स्टेशनचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सुनील शेळके, गणेश खांडगे, सुलोचना आवारे, सुशील सैंदाणे यांनी केली. जिजामाता चौक ते भेगडे आळी पर्यंतच्या चुकीच्या पद्धतीने केलेल्या रस्ता रुंदीकरणास नगरपरिषद प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप अरुण भेगडे पाटील, अमोल शेटे यांनी केला. शाळा व्यवस्थापनाने शाळेच्या जागेत स्वतंत्र वाहनतळ सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी गणेश खांडगे यांनी केली. नागरी दलितवस्ती योजनेअंर्तग कामे करताना स्टेशन आणि गाव विभागात भेदभाव केला जात असल्याचा आरोप सुनील शेळके, अरुण माने, वैशाली दाभाडे यांनी केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)