प्रभात वृत्तसेवा तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार एक डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंतच करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहेत. आयोगाचे सचिव सुरेश कांकांणी यांनी जारी केलेल्या पत्रकात हा स्पष्ट निर्देश देण्यात आला आहे.नगरपरिषदेची निवडणूक दि. २ डिसेंबर रोजी पार पडणार आहे, त्यानुसार दि. १ डिसेंबर रोजी रात्री १० नंतर कोणत्याही प्रकारचा प्रचार, सभा, मोर्चे, रॅली, ध्वनिक्षेपकाचा वापर, पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधीत कोणतीही जाहिरात, प्रसिद्धी, प्रसारण, सोशल मीडियावरील प्रमोशनही थांबविण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. निवडणूक प्रक्रियेत शांतता राखण्यासाठी आणि मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी ही मर्यादा घालण्यात आली असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.