प्रभात वृत्तसेवा तळेगाव ढमढेरे – आठवडे बाजार स्थलांतरित करण्याच्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या हालचालींना स्थानिक व्यापारी वर्गाकडून तीव्र विरोध झाला आहे. शनिवारी (दि. १७) ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने प्रशासनाने बाजार स्थलांतराच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती दिली असून, बाजार ‘जैसे थे!’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मुख्य रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी पाहता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत आठवडा बाजार अंतर्गत बाजारपेठेत नेण्यास व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला. स्थानिक व्यापाऱ्यांच्या सूचना ऐकून घेतल्यानंतर, प्रशासनाने सद्यस्थितीत बाजार तळाची संरक्षण भिंत पाडून नदीकाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी स्पष्ट केले की, रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताची शक्यता निर्माण होते, त्यामुळे अशा विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल.या बैठकीला सरपंच रोहिणी तोडकर, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस, माजी उपसभापती अनिल भुजबळ, ॲड. सुधीर ढमढेरे, तंटामुक्ती अध्यक्ष किशोर रासकर, माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, शेतकरी संघटनेचे सुनील ढमढेरे, ॲड. सुदर्शन तोडकर, भरत भुजबळ, संतोष भुकणे, भगवान खुरपे, विलास खुरपे, धनंजय नरके यांसह महिला व्यापारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लवकरच या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, असेही यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले. “आठवडे बाजारामध्ये रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांनी रस्त्याच्या कडेला भाजी विक्रीसाठी बसू नये. वाहतूक कोंडी होते, अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. – राजेंद्र सात्रस, ग्रामविकास अधिकारी, तळेगाव ढमढेरे.