Talegaon Dabhade : औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची सुरक्षा, आरोग्य आणि सुरक्षित कार्यपरिसर निर्माण करण्यासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाच्या अपर संचालक शारदा होंदुले यांचा सत्कार शासकीय तंत्रनिकेतन , सोलापूर यांच्या वतीने सयाजी हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी शासकीय तंत्र निकेतन सोलापूरचे प्राचार्य डॉ. नरोटे, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अरविंद देशपांडे, प्रा. कदम, प्रा. सय्यद, उद्योगपती नंदकुमार शेलार , तंत्रनिकेतन चे माजी विद्यार्थी , राजेंद्र पवार , विलास बाबर , लतीफ सय्यद , रवींद्र चव्हाण उद्योजक शशिकांत हळदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना दादासाहेब उ-हे यांनी मांडली. त्यानंतर विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शारदा होंदुले यांच्या कार्याचा गौरव केला. औद्योगिक सुरक्षा क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यामुळे अनेक उद्योगांमध्ये सुरक्षितता आणि शिस्त निर्माण होण्यास मदत झाल्याचे वक्त्यांनी नमूद केले. सत्काराला उत्तर देताना शारदा होंदुले यांनी मिळालेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच माजी विद्यार्थ्यांनी तंत्रनिकेतन मधे जाऊन मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनया केसकर यांनी केले. आभार मनोज गायकवाड यांनी केले.