Talegaon Dabhade News – शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा येत्या दोन महिन्यांत सुरळीत करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने विशेष नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा समितीचे सभापती गणेश काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नगरपरिषदेतील उपनगराध्यक्षांच्या दालनात पाणीप्रश्नासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा विभाग प्रमुख अभिषेक शिंदे उपस्थित होते. तळेगाव शहराची लोकसंख्या सुमारे १ लाख २५ हजार गृहित धरून नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र शहरातील काही भागांत अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणी येणे, अवेळी पाणीपुरवठा होणे यांसारख्या समस्या कायम असून नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने पाणीपुरवठा व्यवस्थेचे पुनर्नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या नगरपरिषदेच्या माध्यमातून पवना नदीतून १६ एमएलडी तर इंद्रायणी नदीतून सुमारे १२ एमएलडी पाणी उचलले जाते. त्यानंतर शहरात पहाटे तीन वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत विविध भागांत पाणीपुरवठा केला जातो. मात्र विस्कळीत व्यवस्थेमुळे काही भागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या सर्व समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी पाणीपुरवठा विभाग प्रमुख अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक नियोजन करण्यात येणार असल्याचे गणेश काकडे यांनी सांगितले. यासाठी जुन्या जलवाहिन्यांमधून होणारी गळती रोखणे, आवश्यक त्या ठिकाणी नवीन जलवाहिन्या टाकणे, नव्याने उभारण्यात येणाऱ्या पाणीसाठवण टाक्यांचे काम वेगाने पूर्ण करणे तसेच जुन्या टाक्यांतील गळती थांबविणे या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. येत्या दोन महिन्यांत या कामांची अंमलबजावणी करून शहरातील सर्व भागांना नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.