प्रभात वृत्तसेवा तळेगाव दाभाडे – तळेगाव शहर नाभिक विकास संघटनेच्या सर्व सलून आणि पार्लरमध्ये १ जानेवारी २०२६ पासून नवीन दर लागू करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे शहराध्यक्ष ओंकार शिंदे यांनी दिली.गेल्या पाच वर्षांमध्ये वीजदर, कामगारांचे वेतन तसेच प्रसाधन साहित्याच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढत्या खर्चामुळे नाभिक व्यावसायिकांचा उदरनिर्वाह आणि व्यवसाय टिकवणे कठीण झाले असून, त्यामुळे दरवाढ अपरिहार्य असल्याचे अनिरुद्ध चौधरी यांनी स्पष्ट केले. ग्राहकांनी या निर्णयाला समजून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. तळेगाव शहर नाभिक विकास संघटनेची विशेष सभा गेल्या आठवड्यात शहराध्यक्ष ओंकार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत दरवाढीबाबत सविस्तर चर्चा करून सर्वानुमते नवीन दर लागू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.या बैठकीस उपाध्यक्ष श्रीमंत ताटे, गणेश जगताप, सौरभ दळवी, निलेश मोरे, खजिनदार किसन आंबेकर, प्रशांत मोरे, मुख्य सल्लागार बापू राऊत तसेच सदस्य चंद्रशेखर शिंदे, परशुराम दळवी, शांताराम गायकवाड, विशाल शिंदे आणि विवेक गायकवाड उपस्थित होते. तळेगाव शहर नाभिक विकास संघटनेने सर्व नाभिक बांधवांना १ जानेवारी २०२६ पासून नवीन दरपत्रकानुसारच व्यवसाय करण्याचे आवाहन केले आहे.