Talegaon Dabhade News – तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीतील नागरिकांना मुबलक आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, काही नागरिकांकडून उन्हाळ्यातही पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नगर परिषदेचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख अभिषेक शिंदे यांनी दिला आहे. तळेगाव नगर परिषद हद्दीत सध्या सुमारे १ लाख २५ हजार नागरिक वास्तव्यास असून त्यांच्या पाणीपुरवठ्यासाठी पवना आणि इंद्रायणी नदीवरून दररोज सुमारे २६ एमएलडी पाणी उचलले जाते. शहरातील चौराई जलशुद्धीकरण योजना तसेच तळेगाव स्टेशन परिसरातील इंद्रायणी जलशुद्धीकरण केंद्राद्वारे पाण्याचे शुद्धीकरण करून सुमारे २२ एमएलडी पाणी गाव व स्टेशन परिसरात पुरवले जाते. मात्र, काही नागरिकांकडून नगरपरिषदेच्या पाण्याचा विनाकारण वापर केला जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. घरासमोरील रस्त्यावर पाणी मारणे, दुचाकी व चारचाकी वाहने धुणे, बागांसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करणे तसेच पाण्याच्या टाक्या भरल्यानंतरही नळ बंद न करणे, अशा प्रकारांमुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद नगरपरिषदेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले असून, लवकरच पाण्याचा अपव्यय करणाऱ्या भागांची पाहणी करण्यात येणार आहे. सुरुवातीला संबंधितांना समज देण्यात येईल; मात्र त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्यास कारवाई केली जाईल, असे अभिषेक शिंदे यांनी सांगितले. नगरपरिषदेवर पडतोय आर्थिक भार शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपरिषदेवर मोठा आर्थिक भार पडत आहे. सोमटणे येथून २४० एचपी क्षमतेच्या तीन मोटारी तसेच इंद्रायणी पाणीपुरवठा केंद्रातून १५० एचपीच्या दोन मोटारी कार्यरत आहेत. यासाठी दरमहा सुमारे ६४ लाख रुपयांचे वीज बिल येत असून, संपूर्ण यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी १४ वॉलमन, ३० पंपिंग आणि फिल्टर कामगार, सहा लेबर मेंटेनन्स तसेच दोन कर्मचारी कायम सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जबाबदारीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अभिषेक शिंदे यांनी केले आहे.