Talegaon Dabhade : येथील सामाजिक कार्यकर्ते महेश मधुकर सोनपावले यांना बी दि चेंज फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. शिर्डी येथील साईबाबा मंदिर परिसरातील साई पालखी निवारा येथे आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला भारतीय सैन्य दलाचे निवृत्त सुभेदार मेजर संजय कुमार, कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, अभिनेत्री निवेदिता पगार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. महेश सोनपावले हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून रक्तदान चळवळीत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांनी स्वतः ६४ वेळा रक्तदान केले असून कोरोना काळात चार वेळा प्लाझ्मा दान केले. तसेच कोविड काळात सुमारे ४५० रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधला. २०१३ पासून पंढरपूर वारीतील ‘निर्मल वारी’ उपक्रमात स्वयंसेवक म्हणून कार्य करत त्यांनी स्वच्छता व जनजागृती मोहिमेतही सक्रिय सहभाग नोंदविला आहे.