प्रभात वृत्तसेवा तळेगाव दाभाडे – स्त्री शिक्षणाच्या जननी व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे (पाटील) व उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास भास्कर वाघमारे, रोहित भोसले, आरोग्य निरीक्षक प्रशांत शिवणे, पुरुषोत्तम तेजी, राहुल आगळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना नगराध्यक्ष संतोष दाभाडे म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. समाजाकडून होणारा विरोध, अवहेलना आणि अन्याय सहन करूनही त्यांनी शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवली. महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांनी समता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाच्या चळवळीला नवी दिशा दिली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या कार्याला व विचारांना नमन केले.