प्रभात वृत्तसेवा तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असली, तरी प्रमुख पक्षांकडून अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा न झाल्याने मतदार आणि इच्छुक उमेदवार दोघेही संभ्रमावस्थेत आहेत. नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, प्रचाराला जोर आला आहे. मात्र, उमेदवारांची यादी अद्याप गुलदस्त्यात असल्याने स्थानिक पदाधिकार्यांसह कार्यकर्ते संभ्रमात आहेत. निवडणूक आयोगाने नुकतीच आचारसंहिता लागू केली आहे. १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. १८ नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी, २५ नोव्हेंबरपर्यंत माघार, २६ नोव्हेंबरला चिन्ह वाटप, तर २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासनाने प्रभाग रचना, अंतिम मतदार यादी आणि मतदान केंद्रांची संख्या यासंबंधीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे ८३, तर भाजपकडे ७६ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चुरस असून, स्थानिक नेत्यांच्या शिफारशी आणि संपर्क मोहिमा जोरात सुरू आहेत.पूर्वी आमदार सुनील शेळके यांनी भाजपचे माजी नगरसेवक संतोष दाभाडे पाटील यांना महायुतीकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून वाढदिवसाच्या कार्यक्रमात जाहीर केले होते. परंतु या घोषणेला भाजपकडून विरोध करण्यात आला आणि राष्ट्रवादीकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नाही काय, असा सवाल पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला. यानंतर आमदार शेळके यांनी तळेगाव स्टेशन भागातून सत्यम खांडगे यांची नगरसेवक पदासाठी उमेदवारी जाहीर केली. त्याचवेळी, भाजपचे प्रभारी गणेश भेगडे यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. या वेळी संतोष दाभाडे पाटील, किशोर भेगडे, गिरीश खेर, आणि गणेश भेगडे या चार उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी सादर केली. दरम्यान, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी तळेगाव स्टेशन भागातून निखील भगत, ऋतुजा भगत, लता घोलप, शताब्दी लांघे आणि स्नेहा खांडगे या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. या घडामोडींमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे. येणाऱ्या काही दिवसांत पक्षांची भूमिका स्पष्ट होताच या निवडणुकीची दिशा ठरेल, अशी अपेक्षा तळेगावकरांमध्ये व्यक्त होत आहे. पुरुष मतदार नाराज.. आत्तापर्यंत बहुतांश इच्छुकांनी महिलांसाठी विविध उपक्रम जोमाने राबवले आहेत. परंतु पुरुष मतदारांसाठी कोणताही विशेष कार्यक्रम किंवा सुविधा आयोजित केलेली नाही. त्यामुळे काही पुरुष मतदार, आपण मतदार असूनही आपल्याला दुर्लक्षित केले जात असल्याची खंत व्यक्त करताना दिसत आहेत.