प्रभात वृत्तसेवा तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान शनिवारी (दि. २०) होणार आहे. यासाठी चार प्रभागांमध्ये एकूण २० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.प्रभाग क्रमांक २ साठी एमआयटी प्री-स्कूल कॅम्पस, मायमर हॉस्टेल कॅम्प येथे ६ मतदान केंद्रे, प्रभाग क्रमांक ७ साठी माउंट सेंट ऍन हायस्कूलच्या मुख्य इमारतीत ५ केंद्रे, प्रभाग क्रमांक ८ साठी नवीन समर्थ विद्यालय येथे ३ तसेच सह्याद्री इंग्लिश स्कूल येथे २ केंद्रे, तर प्रभाग क्रमांक १० साठी थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेत ४ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सर्व मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.दरम्यान, मतमोजणी रविवारी (दि. २१) सकाळी १० वाजता तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत होणार आहे. मतमोजणीसाठी दोन नोडल अधिकारी, १४ झोनल अधिकारी तसेच २८ मतमोजणी सहाय्यक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, नगर परिषदेचे ६० कर्मचारी सहाय्यक म्हणून काम पाहणार आहेत.निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १९ डिसेंबर रोजी रात्री १० नंतर कोणताही प्रचार, सभा किंवा ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई असणार आहे. नागरिकांनी निर्भय वातावरणात मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.