प्रभात वृत्तसेवा तळेगाव दाभाडे – महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सन २०२६ ते २०३० या कालावधीसाठी तळेगाव दाभाडे येथील सामाजिक कार्यकर्ते धनंजय वाडेकर यांची सभासद म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ही शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य व नामांकित संस्था असून संस्थेअंतर्गत ७७ युनिट्स कार्यरत आहेत. या संस्थेत सध्या सुमारे ३५ हजार विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. धनंजय वाडेकर यांनी लहानपणापासून संघ स्वयंसेवक म्हणून कार्य करत गटनायक ते जिल्हा व्यवस्था प्रमुख अशी विविध जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. ते स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य व अध्यक्ष राहिले असून, स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुलाची स्थापना त्यांनी केली आहे. तसेच गेल्या १० वर्षांपासून आश्रमशाळा, कामशेत येथे शाळा समिती सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे तसेच आदिवासी संस्कृती जतन करण्यासाठी त्यांनी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत.