तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असून २८ पैकी १७ जागांवर राष्ट्रवादी तर ११ जागांवर भाजप उमेदवार निवडणूक लढवतील, अशी घोषणा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष गणेश खांडगे व तळेगाव दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक सुरेश चौधरी उपस्थित होते. भाजपचे पदाधिकारी मात्र या पत्रकार परिषदेस उपस्थित नव्हते. सुरुवातील स्वबळावर लढण्याचा नारा देणारे स्थानिक पदाधिकारी आता युतीसाठी सहमत झाले आहेत. त्यानुसार दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली होती. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत देखील चर्चा झाली होती. या बैठकीत तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक महायुतीतर्फे लढविण्याचा निर्णय झाल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. यामध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेची नगराध्यक्ष पदाची जागा अडीच वर्षासाठी भाजपकडे तर पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी ती राष्ट्रवादीकडे राहील. तसेच लोणावळा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या बाबत पहिले अडीच वर्षे राष्ट्रवादीकडे व नंतर अडीच वर्ष भाजपकडे नगराध्यक्ष पद राहील असे निश्चित झाल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले. यामध्ये महायुतीकडून थेट नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी महायुतीच्या मधून राष्ट्रवादी पक्षाच्या पहिली अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. उमेदवारांचे नाव प्रभाग 1 – आशा अशोक भेगडे प्रभाग 2 – संदीप बाळासाहेब शेळके प्रभाग 3- सिद्धार्थ गोरख दाभाडे प्रभाग 4 – गणेश मोहनराव काकडे प्रभाग 5 – भारती सुरेश धोत्रे प्रभाग 7 – सत्यम गणेश खांडगे प्रभाग 9 – हेमलता चंद्रभान खळदे प्रभाग 10 – संगीता सतीश खळदे प्रभाग 12 – संतोष छबुराव भेगडे वडगावबाबत काय? वडगाव नगरपंचायतीमध्ये देखील तेथील स्थानिक भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन महायुतीचा निर्णय घेतल्यास त्याप्रमाणे निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे. परंतु या नगरपंचायतीमध्ये अनेक विकासाची कामे झाल्यामुळे प्रथम नगराध्यक्ष पदाचा मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षित असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया नाही निवडणुकीत सर्वांत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या जागावाटपाची घोषणा करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्िथतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जागावाटपाचा फाॅम्र्यूला आणि पहिली यादी देखील जाहीर केली. या घोषणेनुसार भाजपचा नगराध्यक्ष असला तरी भाजप कधीही बहुमताच्या जवळपास पोहचू शकणार नाही. बहुमतासाठी १५ नगरसेवक असणे गरजेचे आहे आणि राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या या फाॅम्र्युलानुसार भाजप फक्त ११ जागांवर निवडणूक लढविणार आहे. याबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिकि्रया आलेली नाही. तसेच याबाबत युती घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.