Talathi Arrested – वडिलोपार्जित जमिनीवरील फेरफार नोंद करून देण्यासाठी लाखोंची लाच मागणाऱ्या मुळशी तालुक्यातील माण सजाच्या तलाठ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. उर्वरित २५ हजारांची लाच स्वीकारताना तलाठी संतोष प्रल्हाद राणे हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. संतोष प्रल्हाद राणे (वय ४५, रा. गंगा ओशियन पार्क, कात्रज-कोंढवा रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे तलाठ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर वडिलोपार्जित जमिनीच्या फेरफार उताऱ्यावर तक्रारदार आणि त्यांच्या भावाचे नाव नोंदविण्याचे काम प्रलंबित होते. हे काम करून देण्यासाठी तलाठी संतोष राणे याने तब्बल १ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली. संतोष राणे हा मुळशी तालुक्यातील माण सजामध्ये तलाठी आहे. तक्रारदाराकडून यापूर्वीच १ लाख रुपये स्वीकारण्यात आले होते. फेरफार नोंदही करण्यात आली होती. मात्र उर्वरित २५ हजारांसाठी आरोपी सातत्याने तगादा लावत होता. लाचेची मागणी वाढत असल्याने त्रस्त झालेल्या तक्रारदाराने ११ मे २०२६ रोजी पुणे एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. १४ मे रोजी झालेल्या पडताळणीत तलाठी राणे याने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर एसीबीच्या पथकाने मंगळवारी माण येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास तक्रारदाराकडून २५ हजारांची रक्कम स्वीकारताना संतोष राणे याला रंगेहात पकडण्यात आले. लाच मागितल्यास तक्रार करा” शासकीय कामासाठी कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त पैशांची मागणी करत असल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.