पिंपरी | आम्हाला तुमच्यात घ्या; पण उमेदवारी द्या

पिंपरी, (प्रतिनिधी) – उमेदवारीसाठी पक्ष बदलण्याच्या तयारीत शहरात अनेक नेते आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण इच्छुक असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आपल्या सर्व समर्थकांसह येण्यास तयार आहेत. त्यासाठी अनेकांनी संपर्क केल्याचा दावा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या विविध राजकीय पक्षांची उमेदवारांची यादी जाहीर होत असताना अनुसूचित जातीकरिता राखीव असलेल्या पिंपरीतील उमेदवारीचा तिढा अजूनही कायम आहे.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार आण्णा बनसोडे यांना पुन्हा संधी द्यायची की नवा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचा? यावर राष्ट्रवादीत खल सुरू आहे.
माजी आमदारांसह जवळपास अर्धा डझनपेक्षा अधिक इच्छुकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची तयारी दर्शविली आहे, असा दावा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला आहे.
येत्या दोन दिवसांत पिंपरीतील उमेदवार जाहीर केला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी मंगळवारी (दि.22) पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महिला अध्यक्ष कविता आल्हाट,युवक अध्यक्ष शेखर काटे,युवती अध्यक्ष वर्षा जगताप, माजी नगरसेवक श्याम लांडे, माया बारणे, माई ढोरे, फजल शेख, गोरक्ष लोखंडे, विजय लोखंडे,
मायला खत्री, ज्ञानेश्वर कांबळे, ज्योती गोफने, कविता खराडे, वर्षा जगताप, संगीता कोकणे, मनीषा गटकळ यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
योगेश बहल यांनी इच्छुकांची नावे सांगत राजकारणातील घडामोडी स्पष्ट केल्या. बहल यांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीतील मित्रपक्षांसह मविआच्या घटक पक्षातील इच्छुकांनीही संपर्क साधला आहे.
इच्छुक आपल्या समर्थक पदाधिकाऱ्यांसह पक्षात येण्यास तयार असल्याचे बहल यांनी सांगितले. इच्छुकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच काही इच्छुकांनी पार्थ पवार यांची भेट घेत, पिंपरीतील उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे.
आम्ही युती धर्म पाळणार
पिंपरी चिंचवड शहरातील तिन्ही मतदारसंघात महायुतीचे आमदार निवडून येतील असा विश्वास पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष योगेश बहल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच आम्ही युतीधर्म पाळणार. युतीच्या सर्व उमेदवारांचे मनापासून काम करणार असेही बहल यांनी सांगितले.
महायुतीच्या धर्माचे पालन करून, पक्षाशी निष्ठा ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहतील, तसेच पिंपरी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार निवडून येईल असा विश्वास योगेश बहल यांनी व्यक्त केला.
येत्या दोन दिवसांत निर्णय
या सर्व इच्छुकांची निवडून येण्याची क्षमता तपासून येत्या दोन दिवसांत यावर निर्णय घेऊन, उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला जाणार आहे. त्याकरिता या सर्व इच्छुकांचा अहवाल सादर केला जाणार आहे, अशी माहिती बहल यांनी दिली.
पिंपरी विधानसभा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी भाजपचे विधान परिषद आमदार अमित गोरखे आणि उमा खापरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला आहे.
उमेदवारांची निवड सर्वेक्षण आणि जनतेच्या मते विचारात घेऊन पिंपरी विधानसभेत उमेदवार दिला जाईल. विधानसभा निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवार आहेत. हे लक्षात घेता, काही पदाधिकारी पक्ष सोडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी कबूल केले.





