satara | प्लॅस्टिक निर्मूलनाची मोहीम युद्धपातळीवर राबवा

सातारा, (प्रतिनिधी)- निसर्गाची अनिश्चितता संपवायची असेल तर मोठ्या प्रणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेऊन ग्रीन इम्पॅक्ट तयार करा. धरण क्षेत्रात आणि उजाड डोंगर, माळरानांवर विविध शासकीय योजना, कंपन्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी आदी माध्यमातून वृक्ष लागवड मोहिम मोठ्या प्रमाणावार राबवा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. प्लॅस्टिक निर्मूलन उपक्रम हाती घेऊन संपूर्ण स्वच्छता मोहिमही युध्दपातळीवर राबिण्याचे निर्देश त्यांनी दिले.
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई परिस्थिती आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, नगरपालिका प्रशासन उपायुक्त पूनम मेहता, टंचाई निवारण नोडल अधिकारी निलिमा धायगुडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक आणि जयंत शिंदे, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण,
विजया यादव, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्यासह प्रातांधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. पुलकुंडवार म्हणाले, आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर उजाड डोंगर, वैराण माळराने दिसत आहेत.
ती हिरवीगार करा. वन विभागासह सर्व यंत्रंणानी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणावर पुन्हा नवीन झाडे लावली पाहिजेत. ती जगवली पाहिजेत आणि संवर्धित केली पाहिजे. याबरोबरच अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, कचरा, घाण डोळ्याला खटकली पाहिजे. आपण समाजाचा घटक आहोत.
देशाचा नागरिक आहोत. आपला परिसर, आपला गाव स्वच्छ ठेवणे आपली जबाबदारी आहे याची जाणीव ठेवून संपूर्ण स्वच्छता मोहिम राबवा. पुढच्या पिढीसाठी प्लॅस्टिक घातक आहे याची जाणीव ठेवून कोणाचेही भय न बाळगता प्लॅस्टिकचे अनधिकृत साठे, विक्री,
उत्पादन आदी ठिकाणी मोठया प्रमाणावर छापे टाका आणि प्लॅस्टिक निर्मूलनाची मोहिम युध्द पातळीवर राबवा, माणसांच्या आणि जनावरांच्या शरीरात प्लॅस्टिक पोहचले आहे. पाणी अन्न प्रदूषित होत आहे. हे दुष्ट चक्र तोडण्यासाठी सर्वांनी या मोहिमेमध्ये झटून सहभागी व्हा, असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्ह्यामध्ये यावर्षी जलसिंचन विभागाने अनेक ठिकाणाची गळती काढण्याचे काम केले आहे. त्यामुळे पाण्याच्या दोन आवर्तनामधील कालावधी वाढून शेवटच्या घटकापर्यंत व्यवस्थितपणे पाणीपुरवठा झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या बैठकीत दिली असता सातारा जिल्ह्यात हे काम अत्यंत महत्त्वाचे व प्रभावी झाले असल्याचे सांगून विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी इतर कालव्यांची पाण्याची गळती काढून शेवटच्या घटकापर्यंत पाणीपुरवठा व्हावा,
यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे सांगितले. चारा डेपो, चारा छावणी मागणीचे फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी आणि सासवड या दोन ठिकाणचे प्रस्ताव शिफारशीसही शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचेही डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी सांगितले.





