सुनील तटकरेंवर निलंबनाची कारवाई करा; खा. सुप्रिया सुळे यांची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील बंडखोरीचा मुद्दा आता लोकसभेत पोहोचला आहे. शरद पवार गटाने 4 महिन्यांपूर्वी राज्यसभेच्या सभापतींकडे प्रफुल्ल पटेल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली होती. आता त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे खासदार सुनील तटकरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सुनील तटकरे यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांच्या गटात जाणे पसंत केले आहे. याद्वारे त्यांनी पक्षाची घटना व नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यानुसार, त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तटकरेंवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मी 4 जुलै 2023 रोजी भारतीय राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूची अंतर्गत सुनील तटकरे यांना अपात्र करण्यासंबंधीची याचिका दाखल केली होती. 4 महिने झाले तरी त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. दोषी खासदाराची कृती म्हणजे 10 व्या अनुसूचीवर हल्ला आहे. सुप्रीम कोर्टानेही संविधान व लोकशाही तत्वे खऱ्या अर्थाने टिकवून ठेवण्यासाठी अशा याचिकांचे वेळीच निराकरण करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे कृपया आमच्या याचिकेचा निकाल लावण्यसाठी आणखी विलंब करू नका, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यांनी हे निवेदन ट्विटही केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्यावर 2 जुलै 2023 रोजी पक्षाची घटना व नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यानुसार त्यांनी शरद पवारांपुढे या दोघांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर आता सुळे यांनी थेट लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेतली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील बंडखोरीच्या मुद्यावर सध्या निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. पक्षाच्या शरद व अजित पवार या दोन्ही गटांनी आपलाच गट खरा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष असल्याचा दावा केला आहे.





