‘पैसे घ्या पण भुरट्यांना ‘मत’ देऊ नका ! किरण मानेंनी बहिणींना दिला सल्ला

सध्या सुरु असलेल्या अनेक महिला अत्याचारांच्या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. असं असतानाच दुसरीकडे महायुती सरकारच्या लाडकी बहिण योजनेची देखील बरीच चर्चा सुरु आहे. पण आम्हा महिलांना पैसे नको पण सुरक्षा द्या अशी मागणी या घटनांनंतर राज्यातील महिलावर्गाकडून केली जातेय. त्यावर आता एका मराठी अभिनेत्याने केलेली पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
किरण माने यांची पोस्ट काय?
अभिनेते आणि ठाकरे गटाचे किरण माने यांनी पोस्ट करत म्हटलं की, लाडक्या बहिणींनो, पैसे परत करू नका. ते त्यांच्या खिशातले नाहीत. आपलेच आहेत. ते पैसे देण्यामागं त्यांचा जो कावा आहे, तो साध्य होऊ देऊ नका. या भुरट्यांना ‘मत’ देऊ नका !ठेचायची तर ‘नांगी’… नको तिथे घाव घालायचा नाही. पैसे घ्या…पण मत देऊ नका. विषय कट.
लाडकी बहिण योजनेअंतर्गत सरकारकडून महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये जमा होणार आहेत. रक्षाबंधनची भेट म्हणून पहिल्याच महिन्यात या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये सरकारकडून जमा करण्यात आले.





