महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी पुढाकार घ्या : मुख्यमंत्री

मुंबई – कृषी, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य-औषध या क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी, मराठी तरुणांना जगाच्या स्पर्धेत उभे करण्यासाठी पुढाकार घ्या. आपण एकमेकांला सहकार्य करत महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जगभरातील उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिली. अखिल आंतरराष्ट्रीय मराठी इंडियन्स (आमी) परिवारासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित संवादाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
जगाच्या कानाकोपऱ्यातून जय महाराष्ट्र ऐकू येतो आहे, हा अंगावर रोमांच आणणारा क्षण आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या जगभरातून आपण शुभेच्छा देत आहात. मराठी माणसाने जग व्यापून टाकले आहे, हा अनोखा अनुभव आहे.
मराठी माणूस आपल्या कौशल्याने त्या-त्या देशाच्या अर्थकारणाला हातभार लावतो आहे. त्यांचा फायदा आपल्या मराठी मुलांना, तरुणांना व्हावा. त्यांना संघर्ष करावा लागू नये, त्याची भविष्याची वाटचाल सुकर व्हावी यासाठी आपल्याला पुढाकार घेता येईल. त्या अनुषंगाने आपला त्या-त्या क्षेत्रातील अनुभव- अभ्यास महाराष्ट्रालाही उपयुक्त ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात शिक्षण, कृषी, तंत्रज्ञान आणि नवीन उद्योग संकल्पना यांच्या स्वागताचे धोरण आहे. त्यातून विदेशातील मराठी उद्योजक, व्यावसायिक, तज्ज्ञ यांच्या समवेत महाराष्ट्र शासन समन्वयासाठी प्रयत्न करेल. या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, नव्या संकल्पनांचेही स्वागत केले जाईल.
उद्योग जसा आखीव-रेखीव असतो, तसेच त्याला संघटीत करण्याचा प्रयत्न आहे. त्याला दर्जेदार-गुणवत्तेचा पीक घेण्यासाठी प्रशिक्षित करावे लागणार आहे. ग्लोबल वार्मिंगचे दुष्परिणाम भोगतो आहे. त्यासाठी आता आम्ही आपण ई-व्हेईकल्सचे धोरणही आणले आहे.
अशा कृषी, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य सुविधा, औषध या क्षेत्रात आपल्याला एकत्र येऊन काम करता येईल. त्यासाठीच्या सूचना, नव्या प्रकल्प, संकल्पांचे स्वागत आहे. मराठी माणूस काय करू शकतो, हे तुम्ही दाखवून दिले आहे. आता महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असे प्रयत्न करू. तुम्ही भरारी घेतली आहे, आता नव्या पिढीतील तरुणांना गरुड भरारीसाठी पंख देण्यासाठी पुढे या, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.





