Satara | कोरेगावमधील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा

कोरेगाव, (प्रतिनिधी) – कोरेगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. बाजारपेठेत भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. कचराकुंड्या, मंदिर परिसर, बाजार पटांगण आदी ठिकाणांचा ताबा भटक्या कुत्र्यांनी घेतल्याचे दिसून येते; परंतु याकडे नगरपंचायत प्रशासन लक्ष देत नाही.
वारंवार तक्रारी करूनही कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्याकडे केली आहे. बाजारपेठेतील (प्रभाग नऊ) नागरिक व युवा कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 12) मुख्याधिकार्यांना निवेदन दिले.
यावेळी सुनील वाकडे, दीपक माळी, तय्यबअल्ली मुल्ला, शंभू गाढवे उपस्थित होते. भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. बाजारपेठ परिसरात आणि शहराच्या विविध भागात मोकाट कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कुत्र्यांनी शुक्रवारी पाळीव शेळीवर हल्ला केला. मात्र, नागरिकांनी कुत्र्यांना वेळीच हाकलल्याने शेळी वाचली. भटकी कुत्री शाळकरी विद्यार्थ्यांचा पाठलाग करतात. त्यामुळे भीतीने मुले शाळेत जाण्यास टाळाटाळ करत असल्याची पालकांची तक्रार आहे. भटक्या कुत्र्यांमुळे रात्री रस्त्याने ये-जा करणे कठीण झाले आहे.
भटकी कुत्री दुचाकीवरून जाणार्यांचा पाठलाग करतात. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेकदा करूनही, कार्यवाही होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. गल्लोगल्ली ही परिस्थिती आहे. नगरपंचायतीने पुढाकार घेऊन भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.





