सोलापूर : सांगोल्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तुम्ही मला दोन तारखेपर्यंत सांभाळा मी तुम्हाला पुढील पाच वर्ष सांभाळतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत म्हटले आहे. यावेळी त्यांनी, सांगोल्याचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्या आठवणीही जागवल्या. मुख्यमंत्री म्हणाले, मी यापूर्वीही सांगोल्यात प्रचाराला आलो होतो. मात्र, जे माझे आदर्श होते त्या स्व. गणपतराव देशमुख यांच्या विरोधात मला मत मागावे लागत होते. मात्र, यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि आम्ही एकत्र लढत असल्याने हे मत मागताना मला खूप आनंद होत आहे. सांगोल्यात आघाडी करताना शेकाप आणि भाजप एकत्र येत होते, त्यावेळी बापूंशीही बोलून शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन मी केले होते, असेही फडणवीसांनी सांगितले. चेहरा मोहरा बदलण्यासाठी तुम्ही ही नगरपालिका निवडून आणा, देवाभाऊ सहित संपूर्ण सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे करतो, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप आणि पालकमंत्र्यांना इशारा देत शहाजी बापूंच्या मागे मी खंबीरपणे उभा आहे, असे म्हटले होते. मात्र, त्यांनी कोणावरही टीका टिप्पणी करणार नसून केवळ विकासावर बोलणार असल्याचे सांगितले. संपूर्ण भाषण त्यांनी विकासाच्या प्रश्नावर केले. सोलापूर जिल्ह्यात बहुतांश भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली आहे. सांगोल्यातही तसेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे, सांगोल्यात भाजपने विश्वासघात केल्याचे सांगत माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला होता. आता, त्याच सांगोल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेत मतदारांना आवाहन केले आहे.