- चंद्रकांत पाटील यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना ः सेवा सप्ताहाचे आयोजन
पिंपरी – शहरातील करोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी रक्तदान, प्लाझ्मादानाचे कार्यक्रम घ्या. लोकांची सेवा करणे हाच भारतीय जनता पार्टीचा मूळ विचार आहे. त्यामुळे करोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य ते उपाय करा अशा सूचना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना केल्या.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा सप्ताह (दि.14 ते 20 सप्टेंबर) आयोजित केला आहे. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड भाजपाच्या पुढाकाराने दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप आणि आत्मनिर्भर योजनांतर्गत प्रातिनिधीक स्वरुपात धनादेश वाटप कार्यक्रम शनिवारी घेण्यात आला. त्यावेळी पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.
यावेळी पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे, शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, उपमहापौर तुषार हिंगे, माजी खासदार अमर साबळे, पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सचिव अमित गोरखे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सरचिटणीस राजू दुर्गे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे, महिला आघाडी शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वामी विवेकानंद यांच्या विचारानुसार पंडित दिनदियाळ उपाध्याय यांनी एकात्म मानववाद असे तत्वज्ञान मांडले. त्यानुसार आता भाजपाने करोनाच्या काळात 2 कोटी 18 लाख लोकांना ताजे अन्न पोहोचवले आहे. तसेच, 40 लाख कुटुंबांना आपण अन्नधान्याचे पॅकेट वाटप केले आहे. मानवसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून भाजपा काम करीत आहे. शेवटच्या रांगेतील माणसाचेही कल्याण झाले पाहिले, असा आमचा हेतू आहे. त्यासाठी शहरपातळीवरही प्रयत्न करा असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.