शिरूर -शिरूर तालुक्यातील सर्व धर्मादाय व खासगी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्याबाबत नोंदणी करावी, या मागणीसाठी शिरूर शहर व तालुक्यातील विविध संघटनांनी प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांना निवेदन दिले आहे. या योजना घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करा अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी शिरूर नगरपरिषदेचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते मंगेश खांडरे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, माजी सरपंच प्रकाश थोरात यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेला शासनाच्या आरोग्य विभागाने 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. 31 जुलैला या योजनेची मुदत संपली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी या योजनेनंतर राज्यातील प्रत्येक व्यक्तींसाठी लागू करण्यात आली आहे. 23 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. शिरूर शहर, तालुक्यातील खासगी व धर्मादाय संस्थेच्या अखत्यारीतील रुग्णालये या योजनेची नोंदणी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य गरीब जनता या योजनेपासून वंचित राहात आहे. शासनाकडून खासगी हॉस्पिटलमधील 80 टक्के बेड अधिगृहित करण्यात आले आहेत असे सांगण्यात येते. सर्वसामान्य जनतेला उपचार खर्च करण्यासाठी जनआरोग्य योजनेमध्ये तालुक्यातील सर्व खासगी रुग्णालयांनी आपली नोंदणी करणे गरजेचे आहे. शासनाने सर्व रुग्णालयांना त्वरित या योजनेची ऑनलाइन नोंदणी करून घेण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.