“कंगनाच्या देशद्रोही वक्तव्यांबाबत कारवाई करा” – मुंबई पोलिसांकडे तक्रार

मुंबई – अभिनेत्री कंगना रानौतने भारतीय स्वातंत्र्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्याचा देशभरातून निषेध करण्यात येतोय. कंगनाने एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये बोलताना “भारताला खरं स्वातंत्र्य २०१४मध्ये मिळालं, १९४७ जे मिळालेलं ती भीक होती.” असं विधान केलं होत.
याबाबतचा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. अशातच आता याप्रकरणी कंगनावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे करण्यात आली आहे.
कंगनाच्या प्रक्षोभक व देशद्रोही वक्तव्यांबाबत तिच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे. याबाबत मुंबई पोलिसांकडे लेखी मागणी केली करत कंगनाविरोधात भारतीय दंड संहितेच्या ५०४, ५०५ व १२४ अ अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केल्याचं प्रीती शर्मा मेनन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर सांगितलंय.
दरम्यान, कंगनाच्या या बेताल वक्तव्यानंतर ट्विटरवर तिच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे. भाजप नेते वरून गांधी यांनी देखील कंगनाच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त करत ‘या विचारसरणीला वेडेपणा म्हणावे की देशद्रोह?’ असा सवाल उपस्थित केला.
तत्पूर्वी, भाजपची कडवी समर्थक म्हुणुन ओळखल्या जाणाऱ्या कंगनाने भाजपचे समर्थन करताना यापूर्वी देखील अनेकदा मर्यादा ओलांडल्याचे पाहायला मिळाले आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात खलिस्तानी असल्याचा आरोप कंगनाने केला होता. तिच्या अति उजव्या ट्वीट्समुळे तिला ट्विटरने ब्लॉक केले आहे.





