पुणे – पुण्याच्या पहिल्या-वाहिल्या मेट्रोचे उदघाटन आज मेट्रोचे महाव्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले. या मेट्रोची चाचणी संत तुकारामनगर ते फुगेवाडी या मार्गावर घेण्यात येणार आहे.
ट्रेन संच पूर्णतः स्टेनलेस स्टील या धातूपासून बनविले आहेत. वजनाला हलके असलेल्या या ट्रेन संचामध्ये अत्याधुनिक एलईडी प्रकारचे दिवे लावलेले असून, बाह्यप्रकाशाच्या तीव्रतेचे आतील दिवे आपोआप कमी अधिक तीव्र करण्याची यंत्रणा यात आहे. या ट्रेनचा अधिकतम वेग तासी 90 किमी असणार आहे. या ट्रेनमध्ये मोबाईल, लॅपटॉप, चार्जिंग सुविधा असून, प्रवाशांसाठी दृकश्राव्य सूचनाप्रणाली असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली. तसेच मेट्रो तीन कोचची असून, एका मेट्रोमध्ये 950 ते 970 प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतात.
दरम्यान, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन डिसेंबर अखेर शहरात मेट्रो धावेल, असे जाहीर केले होते. मात्र, संथगतीने सुरू असलेले काम, कामगारांची आंदोलने आणि कामात येणारे अडथळे यामुळे डिसेंबर अखेरची डेडलाइन चुकणार अशी शक्यता निर्माण झाली होती. यानंतरही मेट्रोच्या उन्नत मार्गावर चाचणी घेण्यासाठी डिसेंबर अखेरची डेडलाइन पाळण्यासाठी घाई सुरू असून, किमान मार्गावर ट्रेन चढविण्याचे तरी काम पूर्ण करण्याचे प्रायोजित आहे. सध्या मार्गावर विजेची सोय झालेली नसून, मेट्रोच्या स्थानकांची कामेही अपुरी आहेत. त्यामुळे उन्नत मार्गावर चढविलेली मेट्रो धावणार की केवळ उन्नत मार्गावर चढविली जाणार याकडे लक्ष लागले आहे.