“जरा दम तर काढा, त्यांनी पंतप्रधान व्हायला हवं”; कृषिमंत्री ॲड. कोकाटेंचा भुजबळांना टोला

Chhagan Bhujbal vs Manikrao Kokate | महायुती सरकारच्या मंत्रीमंडळात राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट) छगन भुजबळ यांना डावलण्यात आले. यावरून त्यांनी जाहीररित्या नाराजी देखील व्यक्त केली. तसेच त्यांनी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावरही टीका केली.
मंत्रिमंडळाचे खाते वाटप झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातून माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. कोकाटे यांना कृषी खाते मिळाले आहे. त्यानंतर त्यांना भुजबळ यांच्या नाराजीबाबत विचारण्यात आले. त्यावर त्यांनी ‘मला वाटतं भुजबळांनी देशाचा पंतप्रधान व्हावे,’ असा टोला लगावला.
माणिकराव कोकाटे काय म्हणाले ?
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माणिकराव कोकाटे प्रथमच आपल्या सिन्नर मतदारसंघात आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना मंत्रिपद आणि छगन भुजबळ यांच्या नाराजीविषयी विचारले. त्यावर कोकाटे म्हणाले, “सरकार स्थापन होऊन आता ४ दिवस झाले आहेत. राज्यसभा कुठे पळून चालली आहे. दम तर काढला पाहिजे. त्यांना जे काही पाहिजे ते त्यांनी मागावे. मला काय वाटते याला काही अर्थ नाही. मला वाटते भुजबळांनी देशाचे पंतप्रधान व्हावे. मला काय वाटते ते देशामध्ये, जगामध्ये होईलच असे नाही.”
“भुजबळांना मंत्रिपदाचा कोणी वादा केला होता, हे आपल्याला माहित नाही. त्यामुळे मंत्रिपद मिळाले नाही म्हणून ते नाराज असल्याचे चित्र निर्माण केले जाते. गेल्या २० वर्षांपासून मी आमदार आहे. यंदा आम्हाला पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे, त्यामुळे त्यांनी काही दिवस वाट पाहावी,” असेही कोकाटे यांनी म्हंटले.
“राजकारणात बदल स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. लोकसभेच्या काळात अनेक लोकांनी निर्णय घेतला. आता लावलेले पोस्टर्स कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत. मला विचारून पोस्टर लावलेले नाही. माझ्या मतदारसंघात अनेक कार्यक्रमात भुजबळांचे फोटो मी लावलेच आहेत. त्यामुळे सिन्नरमध्ये जे बॅनर लागले त्यात भुजबळांचा फोटो नसेल तर तो माझा दोष नाही, कार्यकर्त्याचा आहे,” असे त्यांनी सांगितले.
नाशिकचा पालकमंत्री आपल्याच पक्षाचा राहील. या संदर्भात मुख्यमंत्री घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असेही मंत्री अॅड.कोकाटे यांनी सांगितले.
हेही वाचा:





