तैपेई, (तैवान) – तैवानच्या संसदेमध्ये शुक्रवारी दोन राजकीय पक्षांच्या संसद सदस्यांमध्ये हाणामारी झाली. संसदेतील सभापतींचे आसन मिळवण्यासाठी आघाडीच्या एका राजकीय पक्षाच्या सदस्यांनी रात्री संसदेत प्रवेश केला असता अन्य राजकीय पक्षाच्या सदस्यांनी त्यांना अटकाव केला. तेंव्हा दोन्ही पक्षांच्या सदस्यांमध्ये ही हाणामारी झाली. या संघर्षामध्ये दोन्ही गटातले काही खासदार जखमी झाले, असे तैवानच्या माध्यमांनी म्हटले आहे. मात्र हे खासदार किती गंभीर जखमी झाले आहेत, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. तैवानच्या संसदेतील सत्तारुढ नॅशनल पार्टी किंवा कुओमिनटांग पक्षाकडून तीन महत्वाची विधेयके मंजूर करून घेण्याचे प्रयत्न सुरू होते. एका विधेयकामुळे घटनापीठाचे अधिकार कमी होतील, असा टीकाकारांचा आक्षेप आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना माघारी बोलावण्यासाठी मतदारांच्या याचिकेती आवश्यकता असलेले विधेयक संसदेत मंजूर झाले. तर अन्य दोन विधेयकांवर रात्री संसदेत चर्चा सुरू होती. तिसऱ्या विधेयकानुसार करांद्वारे मिळालेल्या महसुलातील मोठा वाटा स्थानिक सरकारला मिळणार आहे. मात्र या विधेयकामुळे तैवानच्या लोकशाही व्यवस्थेला धक्का बसेल, असा डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचा आहे. या पक्षाच्या सदस्यांनी गुरुवारी रात्री खिडकीतून सभागृहात प्रवेश केला आणि सभापतींचे आसन बळकावले. एकावर एक खुर्च्या ठेवून आसनापर्यंतचा मार्गही त्यांनी बंद करून टाकला. द नॅशनलिस्ट पार्टीच्या सदस्यांनी हे अडथळे काढून डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्हच्या सदस्यांना बाहेर काढायचा प्रयत्न केला. त्यांच्यामध्ये लाथा, बुक्क्यांनी हाणामारी झाली. खासदारांनी पाण्याच्या बाटल्यातले पाणीही एकमेकांवर ओतले. अखेरीस द नॅशनलिस्ट पक्षाच्या सदस्यांनी सभापतींच्या आसनावर नियंत्रण मिळवले आणि सभापती हान क्यो-यू यांना स्थानापन्न केले. डीपीपीच्या सदस्यांनी विधेयकावरील मतदानातही अडथळे आणले. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी हजारो डीपीपी समर्थकांनी विधिमंडळाबाहेर निदर्शने केली. तैवानमधील खासदारांनी २०२० मध्ये देखील संसदेमध्ये अशीच हाणामारी केली होती.