satara | तडवळे संमत कोरेगाव येथे टेम्पो चालकावर

कोरेगाव, (प्रतिनिधी) – तडवळे संमत कोरेगाव येथील पीरसाहेब दर्गा परिसरात उभ्या असलेल्या टेम्पोमधून दहा हजार रुपयांची रोकड चोरून टेम्पो चालकावर तलवारीने वार केल्याप्रकरणी सोन्या भोंग, (रा. आसरे, ता. कोरेगाव) याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरी व मारहाण केल्याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना सायंकाळी सहा वाजता घडली आहे. टेम्पो चालक सुरज दत्तात्रय अदमिले हा जखमी असून, त्याच्यावर कोरेगावच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सुरज अदमिले याने फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी सायंकाळी तडवळे संमत कोरेगाव येथे जात असताना चांदवडी गावानजिक सोन्या भोंग याने टेम्पो अडविला. गाडी हळू चालव असे म्हणत त्याने शिवीगाळ करत पैशाची मागणी केली, पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याने चावी हिसकावून घेतली, त्यानंतर झटापटीत चावी काढून घेऊन मी टेम्पो घेऊन तडवळे येथे पोहोचलो. टेम्पोच्या सीटवर ठेवलेले दहा हजार रुपयांची रोकड भोंग याने पाहिली होती.
त्यानंतर पाठोपाठ भोंग हा तडवळे येथे गेला आणि त्याने टेम्पोमधील दहा हजार रुपयांची रोकड चोरली आणि मला मारहाण केली. तेथून तो निघून गेला, काही वेळातच महिंद्रा पीकअप जीप घेऊन तो परत आला आणि त्याने तलवारीने डाव्या हातावर वार केले. हल्ल्यातून वाचण्यासाठी पळत असताना भोंग याने डोक्यात आणि हाताच्या कोपर्यावर तलवार मारली व धमकी दिली.
तडवळे येथील ग्रामस्थांनी व अन्य वाहनचालकांनी अदमिले यास कोरेगावातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमोल कर्णे तपास करत आहेत.





