satara | तडवळे संमत कोरेगाव परिसरात रानगव्याचा वावर

कोरेगाव, (प्रतिनिधी) – तडवळे संमत कोरेगाव परिसरात सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून रानगवा फिरत असल्याचे फोटो व व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हा रानगवा घराबाहेर आणि शेतात बांधलेल्या जनावरांसमोर जाऊन उभा राहत असून, शेतकर्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन वन विभागाच्या अधिकार्यांनी केले आहे. वन विभागाच्या पथकाने परिसरात जाऊन पाहणी केली.
यापूर्वी बिबट्या, तरस, कोल्हे अशा काही वन्यप्राण्यांनी कोरेगाव तालुक्यातील मानवी वस्तीत प्रवेश केल्याच्या घटना घडल्या होत्या. तडवळे संमत कोरेगाव परिसरात खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतात जाणार्या शेतकर्यांना सोमवारी रानगव्याचे दर्शन झाले. हा प्रौढ नर असल्याचा अंदाज प्राणिमित्रांनी वर्तवला आहे.
याबाबत ग्रामस्थांनी वनक्षेत्रपाल वैभव घार्गे यांना माहिती दिली. घार्गे यांनी वनपालांच्या नेतृत्वाखालील पथक पाठवून दिले. या पथकाने रानगव्याचा शोध घेतला. मात्र, ग्रामस्थांच्या गोंधळामुळे रानगवाशिवारात गेल्याचे समजले.
रानगवा फिरत फिरत येथे आला असला, तरी तो साधारणपणे कोणाला धोका पोहोचवत नाही. त्यामुळे शेतकर्यांनी काळजी घ्यावी. हा रानगवा येथून निघून जाईल, असे वनक्षेत्रपाल वैभव घार्गे यांनी सांगितले.





