ताडोबा पुन्हा पर्यटन होणार खुले

चंद्रपूर – राज्यात मिशन बिगिन अंतर्गत नियम शिथिल करत अनेक गोष्टी सुरू करण्यास परवानगी दिली जात आहे. आता चंद्रपुरमधील जगप्रसिद्ध ताडोबा-व्याघ्र प्रकल्पही 1 ऑक्टोबरपासून पर्यटनासाठी खुले करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र यासाठी सध्या काही अटी-शर्तींवर ताडोबा प्रशासनाचा विचार सुरु आहे.
ताडोबा पर्यटन करोनामुळे 18 मार्चपासून बंद करण्यात आलेले आहे. ताडोबातील पर्यटन, स्थानिकांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न या निर्णयामुळे सुटण्याची शक्यता आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाला 1 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरुवात करण्यासंदर्भात ताडोबा प्रशासन सकारात्मक विचार करत आहे. करोना साथरोग संकटाच्या सुरुवातीच्या काळात मार्च महिन्यापासून हा जगप्रसिद्ध व्याघ्रप्रकल्प संसर्गाच्या भीतीमुळे बंद करण्यात आला होता.
ताडोबातील ऑनलाईन बुकिंग 16 सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पावसाळ्याचा काळ लक्षात घेता बफर क्षेत्रातील या पर्यटनाला अल्प प्रतिसाद मिळाला. दरवर्षी 1 ऑक्टोबर ते पावसाळा लागेपर्यंतचा काळ ताडोबातील पर्यटनाचा हंगाम समजला जातो. हा हंगाम कॅश करण्याच्या दृष्टीने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पर्यटनासंदर्भात मार्गदर्शक तत्वे ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
ताडोबाच्या गाभा क्षेत्रात सव्वाशे जिप्सी जाण्याची परवानगी असून सध्या सुमारे 100 जिप्सीला परवानगी देण्यात येणार आहे. जिप्सी चालक-मार्गदर्शक आणि पर्यटक या सर्वांना मास्क सॅनिटायझरसह अन्य खबरदारीच्या उपाययोजना पाळाव्या लागणार आहेत. सहा प्रवेशद्वारांमधून हे पर्यटन सुरू होणार आहे. या निर्णयाने वन्यजीवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.




