Tabu : बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तब्बू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी तिच्या चित्रपटांमुळे नव्हे, तर रिअल इस्टेटमध्ये केलेल्या मोठ्या गुंतवणुकीमुळे ती चर्चेत आली आहे. तब्बूने मुंबईतील प्रशस्त समजल्या जाणाऱ्या वर्सोवा परिसरात सुमारे 10 कोटी रुपयांचे आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. माहितीनुसार, हे अपार्टमेंट एका प्रीमियम प्रोजेक्टमध्ये असून त्यामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. समुद्रकिनाऱ्याजवळ असलेला वर्सोवा परिसर हा अनेक कलाकारांचा आवडता मानला जातो. 26 मार्च 2026 रोजी या घराची नोंदणी झाली असून, त्यासाठी तब्बूने सुमारे 5.24 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. या घरात 127 स्क्वेअर फूटची प्रशस्त बाल्कनी आणि दोन कार पार्किंगची सोय आहे. नेमकं कुठे आहे हे अपार्टमेंट? हे नवीन अपार्टमेंट वर्सोवा येथील ‘गोदरेज स्कायशोर’ या प्रकल्पात आहे. या घराचे एकूण क्षेत्रफळ 2,153 स्क्वेअर फूट असून त्यात बाल्कनीचाही समावेश आहे. हा प्रकल्प सुमारे 27,000 स्क्वेअर फूट क्षेत्रावर उभारला जात असून ‘ए’ आणि ‘बी’ असे दोन टॉवर्स यात असणार आहेत. प्रत्येक टॉवरमध्ये पाच बेसमेंट आणि 24 मजले असतील. दरम्यान, तब्बूच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती ‘भूत बंगला’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटातील तिच्या कामाचे कौतुक प्रेक्षक करत आहेत. याशिवाय आगामी काळात तब्बू काही मोठ्या प्रोजेक्ट्सचाही भाग असणार आहे. खरंतर या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप सोडली असून, अनेकांच्या आवडत्या अभिनेत्रींच्या यादीच तब्बूचाही समावेश होतो. हेही वाचा : Pan card new rules 2026: गाडी ते घर खरेदीपर्यंत…; पॅन कार्ड नसेल तर अडकतील तुमची महत्त्वाची कामे