Taapsee Pannu: अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या ‘अस्सी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिने गंभीर विषय हाताळला असून तिच्या अभिनयाचे समीक्षकांकडून कौतुक होत आहे. मात्र अलीकडील मुलाखतीत तापसीने एक स्पष्ट विधान केले आहे. तिने सांगितले की, ‘डंकी’सारखा मोठा व्यावसायिक सिनेमा तिच्यासारख्या अभिनेत्रीला वारंवार मिळणे कठीण आहे. डंकी हा चित्रपट तिच्यासाठी दहा वर्षांच्या कारकिर्दीतील एक मोठी भेट असल्याचे तापसी म्हणाली. ती म्हणाली, “मी मुख्य प्रवाहातील किंवा प्रचंड यशस्वी व्यावसायिक अभिनेत्री नाही. त्यामुळे अशा प्रकारचे मोठे प्रोजेक्ट मला सहज मिळत नाहीत.” तिच्या मते, ‘डंकी’मधील भूमिका तिला मिळाली कारण त्या भूमिकेसाठी तिच्यासारख्या अभिनेत्रीची गरज होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले होते. चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. त्याचबरोबर बोमन इराणी, अनिल ग्रोवर, विक्रम कोचर आणि विकी कौशल यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. ‘डंकी फ्लाइट’ या बेकायदेशीर स्थलांतर पद्धतीवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला आणि बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरला. Taapsee Pannu तापसीने तिच्या करिअरबद्दल बोलताना सांगितले की, तिने सुरुवातीला दक्षिणेकडील मोठ्या बजेटच्या चित्रपटांत काम केले. हिंदी चित्रपटसृष्टीत तिची सुरुवात दिग्दर्शक डेविड धवन यांच्यासोबत झाली. त्यानंतर तिने अनुभव सिन्हा आणि अनुराग कश्यप यांच्यासारख्या दिग्दर्शकांसोबत आशयप्रधान चित्रपट केले. सध्या प्रदर्शित असलेला अस्सी हा चित्रपटही अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात भारतातील बलात्काराच्या घटनांवर भाष्य करण्यात आले आहे. देशात दर २० मिनिटांनी एक बलात्काराची घटना घडते, म्हणजेच दररोज सुमारे ऐंशी घटना घडतात, हा गंभीर मुद्दा चित्रपटातून मांडण्यात आला आहे. या चित्रपटात तापसीसोबत कनी कुश्रुति, जीशान अय्यूब, कुमुद मिश्रा, मनोज पाहवा आणि सुप्रिया पाठक यांनीही भूमिका साकारल्या आहेत. Assi (2026) Movie तापसी म्हणाली की, तिने जाणीवपूर्वक वेगळ्या आणि आशयघन भूमिका निवडल्या. त्यामुळे तिला एक विशिष्ट प्रेक्षकवर्ग मिळाला आहे. तो कदाचित मोठा नसला तरी त्या प्रेक्षकांचा विश्वास मिळवणे हे तिच्यासाठी महत्त्वाचे आहे. “प्रत्येक अभिनेत्रीला असा प्रेक्षकवर्ग मिळतोच असे नाही. त्यामुळे मी माझ्या या प्रवासात समाधानी आहे,” असे ती म्हणाली. व्यावसायिक आणि आशयप्रधान चित्रपटांमध्ये समतोल राखताना संघर्ष करावा लागतो, हेही तिने मान्य केले. ‘डंकी’सारखा चित्रपट पुन्हा केव्हा मिळेल, याची खात्री नाही; पण आपल्या वाटचालीबद्दल ती आनंदी असल्याचे तापसीने स्पष्ट केले.