‘गोल्ड’ खरेदीने दसरा गोड; सोने खरेदीसाठी पुणेकरांचा यंदाही अपूर्व उत्साह

पुणे – बदलत्या काळानुसार सुवर्ण अलंकाराची ‘क्रेझ’ वाढली आहे. पूर्वी हौस म्हणून सोन्याकडे पाहिले जायचे. मात्र, आता गुंतवणूक म्हणून पाहिले जात आहे. साडेतीनपैकी संपूर्ण मुहूर्त असलेल्या विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर पुणेकरांनी ‘गोल्ड इज गोल्ड’ म्हणत मंगळवारी (दि.24) सुवर्ण खरेदीचा आनंद लुटला. तर, दिवाळीला सोन्याला मोठी मागणी राहणार असल्याचा अंदाज सराफा व्यावसायिकांकडून वर्तवण्यात येत आहे.
दसऱ्याच्या दिवशी सोने खरेदीची परंपरा आहे. या परंपरेनुसार मंगळवारी सकाळपासूनच नागरिकांनी शहरातील विविध सराफांच्या पेढ्यांवर सुवर्ण खरेदीसाठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत ही गर्दी कायम होती. इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावात 15 दिवसांपूर्वी ग्रॅममागे 100 ते 150 रुपयांनी वाढ झाली. तरीही, नागरिक उत्साहाने खरेदी करत होते. अर्धा ग्रॅमपासून वेढणी बाजारात उपलब्ध होत्या. अनेकांनी शक्य त्या प्रमाणात वेढणी खरेदी केल्या.
“दसऱ्याला यंदा चोख सोन्यापेक्षा दागिन्यांना मोठी मागणी होती. सोन्याच्या दरात होणारी वाढ आणि युद्ध झाल्यानंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणि ऑफर, दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार, सणामुळे ही खरेदी करण्यात येत होती.” – वास्तुपाल रांका, रांका ज्वेलर्स
“दरवर्षी दसऱ्याला सोन्याला मोठी मागणी असते. त्याप्रमाणे यावर्षीही मागणी होती. आपट्याची पाने, वेढणीसह विविध प्रकारच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. दिवाळीला चांगली खरेदी होणार आहे.” – अजितकाका गाडगीळ, पीएनजी अँड सन्स





