इंदापूर : राजस्थानच्या रणरणत्या वाळवंटात,प्रखर ऊन,वेगवान वारे आणि प्रतिकूल हवामानाला समर्थपणे सामोरे जात बॉर्डर अल्ट्रा मॅरेथॉन या देशातील अत्यंत कठीण मानल्या जाणार्या स्पर्धेत इंदापूर तालुक्याचे सुपुत्र संतोष चंद्रहास वाघचौरे यांनी 100 किलोमीटरची शर्यत सलग धावत पूर्ण करून इतिहास घडवला आहे. 12 तास 28 मिनिटांत त्यांनी ही अवघड शर्यत यशस्वीरीत्या पूर्ण करत इंदापूर तालुक्यातीलच नव्हे, तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातील पहिले अल्ट्रा मॅरेथॉन धावपटू ठरण्याचा मान मिळवला. राजस्थानमधील जैसलमेर ते ऐतिहासिक लोंगेवाला बॉर्डर या मार्गावर ही स्पर्धा 7 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता सुरू झाली. 50, 100 व 160 किलोमीटर अशा तीन गटांत ही मॅरेथॉन घेण्यात आली होती. 100 किलोमीटरसाठी 16 तासांची, तर 160 किलोमीटरसाठी 28 तासांची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. देशभरातून सुमारे 1200 धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. इंदापूर तालुक्यातील 54 वर्षीय संतोष वाघचौरे यांनी अथक इच्छाशक्ती, शिस्तबद्ध सराव आणि मानसिक कणखरतेच्या जोरावर 100 किलोमीटरचे अंतर 12 तास 24 मिनिटांत पूर्ण केले. वाळवंटी प्रदेशातील तापमान, सतत वाहणारे वारे आणि शारीरिक थकवा यावर मात करत त्यांनी ही कामगिरी साध्य केली.त्यामुळे इंदापूरच्या क्रीडा इतिहासात त्यांच्या नावाची सुवर्णाक्षरांनी नोंद झाली आहे. 1971 च्या भारत-पाक युद्धात लोंगेवाला बॉर्डरवर शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ सन 2018 पासून या अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. त्या ऐतिहासिक लढाईत पंजाब रेजिमेंटच्या 23 व्या बटालियनमधील अवघ्या 120 जवानांनी संपूर्ण रात्र हजारो पाकिस्तानी सैनिकांना रोखून धरत देशरक्षणाचा पराक्रम केला होता. संतोष वाघचौरे यांच्या या दैदीप्यमान यशाबद्दल रण फॉर फन, इंद्रेश्वर मॅरेथॉन ग्रुप, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा, बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, उद्योजक राजेंद्र जगताप यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. वाळवंटात घडलेला हा पराक्रम इंदापूरच्या युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, वय नव्हे तर जिद्द महत्त्वाची हे संतोष वाघचौरे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.