पुणे | स्वरयोगिनी प्रभाताईंचे संगीत हेच पहिले प्रेम

पुणे, {प्रभात वृत्तसेवा] – स्वरयोगिनी प्रभा अत्रे या महान आणि प्रतिभावान कलाकार होत्या. संगीत हेच त्यांचे पहिले प्रेम होते, असे गौरवोद्गार ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी काढले. ज्यांच्याकडून विद्या मिळवावी, ज्यांना गुरूस्थानी मानावे, असे कलाकार आता फार कमी राहिले आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. प्रभा अत्रे शिष्य परिवारातर्फे स्वरयोगिनी, पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या साहित्य, कला आणि संगीत या क्षेत्रांमधील कार्यावर आधारित ‘स्वरयोगिनी : भारतीय संगीतातील नवोन्मेष’ या महोत्सवातील पहिल्या दिवशी (दि. 2१) प्रभा अत्रे लिखित ‘स्वरमयी’ पुस्तकाच्या पाचव्या आणि ‘सुस्वराली’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे लोकार्पण झाले.
ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. अशोक वळसंगकर, डॉ. मदन फडणीस, ॲड. किरण कोठाडिया, फाउंडेशनचे कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे, डॉ. मनीषा रवी प्रकाश व्यासपीठावर होते. ज्येष्ठ कवी, साहित्यिक, समीक्षक डॉ. अशोक वाजपेयी दृकश्राव्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते.
डॉ. अत्रे यांनी भारतीय संगीतविषयक केलेल्या व्याख्यांनाचा समावेश असलेल्या ‘आलोक’ या १९ भागांच्या दृकश्राव्य मालिकेच्या इंग्रजी आवृत्तीचे लोकार्पण याप्रसंगी करण्यात आले.
फाउंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी. यांनी ‘स्वरमयी’ आणि ‘सुस्वरली’ पुस्तकांच्या प्रकाशनाविषयी, तसेच आगामी उपक्रमांची माहिती दिली.
उत्तरार्धात डॉ. अत्रे यांच्या पुस्तकांमधील निवडक सांगीतिक लेखांचे अभिवाचन आणि त्यांनी रचलेल्या वेगळ्या घाटातील बंदिशींवर आधारित सांगीतिक सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले, तर आभार प्रसाद भडसावळे यांनी मानले.

