Raj Thackeray – मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 2008 मधील कल्याण रेल्वे स्थानकावरील मारहाणप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयात हजर झाले. न्यायाधीश कुलकर्णी यांच्या दालनात आरोपींची नावे एकामागोमाग एक पुकारली जात होती. त्याच यादीत स्वरराज श्रीकांत ठाकरे हे नाव आले. नाव पुकारल्यानंतर ठाकरे यांनी शांतपणे मान हलवत होकार दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 डिसेंबरला निश्चित करण्यात आली आहे. ठाकरे यांचे वकील अॅड. ओंकार राजूरकर यांनी सांगितले की, न्यायालयाने ठाकरे विचारले की गुन्हा कबूल आहे का? राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितले की, गुन्हा कबूल नाही. यावरती न्यायाधीश कुलकर्णी यांनी हे जुने प्रकरण आहे. यासाठी एक महिन्याची वेळ देतो. तुम्ही सहकार्य करा. आता तुम्हाला पुन्हा न्यायालयात येण्याची गरज नाही. 2008 मध्ये रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांवर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या मारहाणीमध्ये रेल्वेचेही मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे व आणखी सात कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यावेळी ठाकरे यांनी मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्याचा मुद्दा मांडल्याने वातावरण तापले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे हिंसाचाराला उत्तेजन मिळाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. प्रकरणाची सुनावणी सुरुवातीला कल्याण न्यायालयात सुरू होती. नंतर ते ठाणे रेल्वे न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे. आरोपी वारंवार अनुपस्थित राहत असल्याने न्यायालयाने अटक वॉरंटही बजावले होते.