Swara Bhaskar: रक्षाबंधन निमित्त स्वरा भास्करची खास आठवण; ‘भाऊ कस्टम ऑफिसमध्ये चार तास अडकला होता’…

Swara Bhaskar: अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या ‘पति पत्नी और पंगा’ या रिअॅलिटी शोमध्ये आपल्या अंदाजाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. रक्षाबंधनच्या निमित्ताने तिने आपला भाऊ ईशानसोबतच्या नात्याच्या काही गोड आणि मजेदार आठवणी शेअर केल्या आहेत.
स्वरा सांगते, “एकदा आम्ही लहान होतो, तेव्हा मी राखी बांधली आणि ईशानने अभिमानाने मला वीस रुपये दिले. गंमत म्हणजे हे पैसे त्याने काही दिवसांपूर्वी माझ्याकडून उधार घेतले होते. त्या वेळी मला थोडा रागही आला आणि हसूही आलं. पण आता तो क्षण आठवला की चेहऱ्यावर हसू येतं. त्यात त्याची निरागस समज आणि जबाबदारीची जाणीव होती.”
तिने एक मजेदार किस्साही सांगितला…
गेल्या वर्षी तिने इंडोनेशियात राहणाऱ्या भावाला राखी पाठवली. त्यात मिठाईही होती. कस्टम ऑफिसला राखीचा कॉन्सेप्ट कळलाच नाही. त्यामुळे ईशान तिथे तब्बल चार तास अडकला. “त्याने मला सांगितलं, आता राखी नको पाठवत जाऊ, माझ्यासाठी ही शिक्षा आहे,” असं स्वरा हसत सांगत होती.
ईशान फक्त तिचा भाऊच नाही तर तिचा मॅनेजरही आहे. तिच्या करिअरमधील करार, अकाउंट्स आणि मीटिंग्स तोच सांभाळतो. “एकदा माझी आर्थिक परिस्थिती बिघडली होती. अकाउंट्स, टॅक्स, जीएसटी काहीच नीट नव्हतं. तेव्हा ईशानने सगळं व्यवस्थित केलं आणि माझी फिल्म फी तीनपट वाढवली. तो माझा सर्वात मोठा आधार आहे,” स्वरा म्हणाली.
शेवटी स्वरा भावाला संदेश देत म्हणाली, “राखीचं नातं प्रेम आणि सुरक्षेचं आहे. पण ही सुरक्षा कधीही नियंत्रणात बदलू नये. प्रत्येक बहिणीला स्वतःचे निर्णय घेण्याची आणि स्वप्नं पूर्ण करण्याची मोकळीक हवी. भाऊ म्हणजे फक्त रक्षण करणारा नव्हे, तर आत्मविश्वास वाढवणारा असावा. हिच खरी रक्षा आहे.”





