Swara Bhaskar: गरोदरपणानंतर वाढलेल्या वजनाबाबत स्वरा भास्करचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली ‘२५ वर्षांची’…

Swara Bhaskar: बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या सडेतोड आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे ती चर्चेत येते, तसेच सोशल मीडियावर ट्रोलिंगलाही सामोरी जाते. अलीकडेच तिने गरोदरपणानंतर वाढलेल्या वजनाबाबत दिलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
स्वराने पती फहाद अहमदसोबत दिलेल्या मुलाखतीत सांगितलं,
“बाळाच्या जन्मानंतर माझं वजन वाढलं आणि यावरून मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगही झालं. सुरुवातीला त्याचा मला परिणाम व्हायचा. पण आता मला समजलंय की मूर्ख लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही.”
तिने पुढे स्पष्ट केलं की गरोदरपणानंतर वजन वाढणं ही पूर्णपणे नैसर्गिक बाब आहे. मात्र, लोकं त्यावरून टोमणे मारतात, ही गोष्ट तिला सुरुवातीला त्रासदायक वाटली होती.
“आई झाल्यावर व्यक्तिमत्त्व बदलतं”
स्वरा म्हणाली, “आई झाल्यानंतर जीवन पूर्णपणे बदलतं. दिसण्यातच नाही तर विचार करण्याची पद्धतही बदलते. खरं तर एक बाळ आईलाही जन्म देते, हे मी स्वतः अनुभवलं आहे.”
“२५ वर्षांची दिसण्याचा अट्टहास नाही”
तिला विचारण्यात आलं की अभिनेत्री असल्यामुळे वजन कमी करण्याचा दबाव येतो का? यावर ती म्हणाली,
“हो, हा दबाव असतो. पण माझ्या मते प्रत्येकाची ही वैयक्तिक निवड आहे. मला २५ वर्षांची असल्यासारखं दिसायचं नाही. मी आता आई आहे, माझं वय ३५ वर्षं आहे आणि माझ्याकडे बाळ आहे. त्यामुळे २५ वर्षांची असल्यासारखी दिसण्याची गरज नाही असं मला वाटतं.”
सध्या कोणत्या प्रोजेक्टमध्ये?
स्वरा सध्या पती फहाद अहमदसोबत ‘पती पत्नी और पंगा’ या शोमध्ये झळकत आहे. या शोमध्ये रुबिना दिलैक-अभिनव शुक्ला, हिना खान-रॉकी जैस्वाल, देबीना-गुरमित चौधरी, अविका गौर-मिलिंद चंदवानी यांसारखी लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपीही सहभागी झाली आहेत.





