स्वानंदी टिकेकरने दिली प्रेमाची कबुली; कोण आहे अभिनेत्रीचा जोडीदार ?

मुंबई – अभिनेत्री स्वानंदी टिकेकर ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आली. स्वानंदी ही अभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची मुलगी आहे. सध्या सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांच्या अफेयरच्या चर्चा रंगलेल्या असतात. यातच आता स्वानंदीने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे आता लवकरच स्वानंदी लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे.
स्वानंदीने इन्स्टाग्रामवर गायक आशिष कुलकर्णीसोबतचा एक फोटो करत प्रेमाची कबुली दिली आहे. हा फोटो शेअर करत स्वानंदीने आमचं ठरलं आणि लव्ह असे दोन हॅशटॅग दिले आहेत. तिच्या या पोस्टनंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. स्वानंदी ही अभिनयासह उत्तम गायनही करते. मात्र तिने वडीलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
दरम्यान, स्वानंदीने ‘दिल दोस्ती दुनियादार’ या सुपरहिट मालिकेनंतर ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती. सोनी मराठीवरील ‘सिंगिंग स्टार’ या गायनाच्या कार्यक्रमाचे स्वानंदीने विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय तिने ‘इंडियन आयडल मराठी’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले आहे. तर आशिष कुलकर्णी गायक आणि गीतकार आहे. त्याने २००८ मध्ये झी मराठीच्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मध्ये आणि २०२० मध्ये इंडियन आयडॉल सीझन १२ मध्ये भाग घेतला होता.



