Swachh Survekshan 2026 – स्वच्छ सर्वेक्षण २०२५ स्पर्धेत राज्यात सर्वप्रथम आणि देशात सातवा क्रमांक प्राप्त केलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२६ साठी देशात अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने शेकडो सफाई सेवक अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने शहराचे रूप पालटण्याचे काम सध्या अविरतपणणे करीत आहेत.पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहायक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात येणाऱ्या अहोरात्र स्वच्छता मोहिमेमुळे नागरिकांना धूळमुक्त, स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड हे उद्योगनगरी आणि गजबजलेल्या बाजारपेठांचे शहर असल्याने पिंपरी कॅम्प, चिंचवड स्टेशन, भोसरी तसेच हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारे प्रमुख रस्ते वाहनांनी गजबजलेले असतात. या मोहिमेत मनुष्यबळासोबत आधुनिक यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मेकॅनिकल स्वीपिंग मशीनद्वारे मुख्य रस्त्यांवरील बारीक धूळ हटवली जाते. वॉटर स्प्रिंकलर्सच्या साहाय्याने रस्ते व दुभाजक धुऊन हवेतल्या धुळीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच कचरा वाहतूक यंत्रणा रात्रीच कचरा डेपोपर्यंत पोहोचवत असल्याने स्वच्छतेच्या कामाला गती मिळत आहे. सर्व कर्मचारी आवश्यक सुरक्षासाहित्य परिधान करून रात्रभर कार्यरत असतात. शहर झोपेत असताना हे ‘स्वच्छता योद्धे’ शहराला नव्या पहाटेची तयारी करून देतात. महापालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरात राबविण्यात येणाऱ्या अहोरात्र स्वच्छता मोहिमेमुळे दिवसभर वाहतुकीने गजबजलेल्या प्रमुख रस्त्यांची प्रभावी साफसफाई शक्य होत आहे. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर आणि सफाई सेवकांचे समर्पित योगदान यामुळे शहराची स्वच्छता पातळी सातत्याने उंचावत आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ मध्ये उल्लेखनीय स्थान मिळवण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे. सफाई सेवकांच्या या प्रयत्नांना बळ देण्यासाठी नागरिकांनी कचरा विलगीकरण करणे व सार्वजनिक स्वच्छता राखणे ही सामूहिक जबाबदारी समजून सक्रिय सहभाग नोंदवावा.