satara | प्रतवारीनुसार आले खरेदीवरून ‘स्वाभिमानी’ आक्रमक

रहिमतपूर, (प्रतिनिधी) – आले खरेदी करणार्या व्यापार्यांनी पुसेगाव येथे बैठक घेऊन प्रतवारीनुसार आले खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. प्रतवारीनुसार आले खरेदी करण्यास संघटनेने विरोध दर्शवला आहे.
याबाबत माहिती अशी, गेल्या दोन वर्षांपासून आले पिकाला उच्चांकी दर मिळत आहे. सध्या आले पिकाच्या पाचशे किलोच्या गाडीसाठी 49 हजार रुपये दर आहे. व्यापार्यांनी सध्या प्रतवारीनुसार जुन्या आणि नवीन आल्याचे दर वेगवेगळे लावून खरेदी करण्याचा ठराव बैठकीत केला आहे.
त्यामुळे नवीन मालाला जुन्या मालाच्या निम्म्याहून कमी दर मिळण्याची शक्यता आहे. त्यातून शेतकर्यांचे नुकसान होणार आहे, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे.
या निर्णयाविरोधात संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, खटाव तालुकाध्यक्ष दत्तूकाका घार्गे आणि आले उत्पादकांनी वाठार किरोली येथे 1 जून रोजी सायंकाळी 5 वाजता एल्गार मेळाव्याचे आयोजन केले आहे. व्यापार्यांचा निर्णय मोडून काढण्यासाठी शेतकर्यांनी मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जुन्या आल्याला जादा दर द्यावा
व्यापार्यांनी जुने आणि नवीन आले अशी प्रतवारी केली, तर प्रचलित दरानुसार जुन्या आले पिकाला जादा दर दिल्यास शेतकर्यांचा काही अंशी फायदा होणार आहे; परंतु जुने आले आहे त्याच दराने आणि नवीन आले निम्म्या दराने खरेदी केल्यास शेतकर्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे व्यापार्यांनी जुन्या आल्याला सध्याच्या दरापेक्षा जादा दर दिला पाहिजे, अशी संघटनेची मागणी आहे.
सातारा जिल्ह्यातून जुने आणि नवीन आले सध्या एकत्र जात आहे. उष्णतेमुळे नवीन आले लवकर खराब होत असल्याने, बाहेरील व्यापारी जिल्ह्यातील आले खरेदी करण्यास उत्सुक नाहीत. याचा फटका जिल्ह्यातील शेतकर्यांना बसत आहे. नवीन आणि जुने आले वेगवेगळे केले, तरच जिल्ह्यातील शेतकर्यांचे आले विकले जाईल.
सध्या बाजारात औरंगाबाद परिसरातून आले येत आहे. 1 जुलैपासून बंगळुरू परिसरातून आवक सुरू होईल. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांचे आले शेतातच राहून, नुकसान होईल. त्यापेक्षा शेतकर्यांनी नवीन व जुन्या आल्याचे दर वेगवेगळे करावेत.
सध्या शेतातून नवीन आले जादा निघत नसल्याने, नंतर होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रतवारी करण्यास शेतकर्यांनी सहकार्य करावे. त्यातून जुन्या आल्याला सध्याच्या दरापेक्षा जादा दर मिळण्याची शक्यता आहे.- सुरेश जाधव, अध्यक्ष, सातारा जिल्हा आले व्यापारी संघटना.





