कोलकता : पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी रविवारी बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष पडताळणीचे स्वागत केले. तशीच प्रक्रिया तृणमूल कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या बंगालमध्येही राबवली जावी, अशी मागणीही त्यांनी केली. बिहारमधील प्रक्रिया एक चांगले पाऊल आहे. त्यामुळे पारदर्शकता येईल. देशातील मतदार याद्यांमध्ये समावेश झालेल्या अवैध स्थलांतरितांची ओळख पटवली जायला हवी. बनावट आधार कार्ड आणि ओळखपत्रांचा वापर करून मतदार बनलेल्यांची नावे वगळली जायला हवीत. अवैध मार्गांनी बनावट आधार कार्ड मिळवलेल्या राेहिंग्यांना शोधण्याची गरज आहे. मतदार याद्यांमध्ये केवळ भारतीय नागरिकांचा समावेश असावा, अशी भूमिका भाजपचे नेते अधिकारी यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. बंगालमधील मतदार याद्यांमध्ये बांगलादेशी घुसखोरांनी स्वत:ची नावे नोंदवली आहेत, असा आरोप याआधी त्यांनी केला होता. बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात अधिकारी यांनी केलेल्या मागणीमुळे त्या राज्यातील राजकीय वातावरणही तापण्याची शक्यता आहे.