सातारा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांच्यात भाजपच्या चिन्हावर मनोमिलन झाल्याने राजेंसाठी नगरपालिका निवडणूक सोपी झाली होती. मात्र, भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. सुवर्णा नरेंद्र पाटील यांना आपल्याकडे घेत नगराध्यपदाची उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने पालिका निवडणुकीत भाजपला कडवे आव्हान दिले आहे. नगराध्यक्ष पदासह पालिकेच्या निवडणुकीत ४५ उमेदवार रिंगणात उतरवल्याने भाजप व महाविकास आघाडीत कडवी झुंज होण्याची शक्यता आहे. सातारा नगरपालिकेत अपेक्षेप्रमाणे उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांचे मनोमिलन झाले. भाजपनेही अत्यंत सावध रणनिती अवलंबत पक्षात बंडखोरी होऊ नये याची खबरदारी घेत शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी अमोल मोहिते यांचे नाव जाहीर केले. नगरसेवकांचीही यादी उशिरा जाहीर केल्याने नाराजांना बंडखोरी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. गेल्या निवडणुकीत सौ. वेदांतिकाराजे भोसले, सौ. माधवी कदम व सौ. सुवर्णाताई पाटील यांच्यात जोरदार लढत झाली होती. या निवडणुकीत सुवर्णा पाटील यांचा पराभव झाला असला तरी तो अनुभव या निवडणुसाठी त्यांना मार्गदर्शक ठरणार आहे. नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून सुवर्णा पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरु केली होती. भाजपच्या श्रेष्ठींकडेही त्यांनी पाठपुरावा ठेवला होता. मात्र, ऐनवेळी शिवेंद्रसिंहराजे यांचे समर्थक अमोल मोहिते यांचे नगराध्यक्षपदासाठी नाव जाहीर झाल्याने सुवर्णा पाटील यांनी आघाडीकडे जाण्याची भूमिका घेतली. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही त्यांच्याशी संपर्क साधत पक्ष प्रवेशाची ऑफर दिली. प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर महाविकास आघाडीकडून त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली. सुवर्णाताईंची राजकीय कारकीर्द, नगरसेविका म्हणून असलेला अनुभव, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मागील अनुभव, उत्तम राजकीय समन्वय आणि महिला संघटन यामुळे त्यांचा चेहरा महाविकास आघाडीला सशक्त वाटला. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. सुवर्णा पाटील यांना संधी मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी भाजपमधील संघर्ष मात्र चव्हाट्यावर आला आहे. दोन्ही राजेंची पालिकेतील सत्ता हिसकावून घेण्यासाठी महाविकास आघाडीने शड्डू ठोकला आहे. नगराध्यक्षपदासह अन्य ४५ उमेदवार रिंगणात उतरवून भाजपपुढे आव्हान निर्माण केले आहे. शहराच्या राजकारणात भाजपमधील राजे गटांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे २१, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ८ आणि काँग्रेसचे १६ उमेदवार नशीब आजमावत आहेत. महायुतीच्या हालचालींवर लक्ष ठेवून महाविकास आघाडीने हालचाली गतिमान केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, प्रदेश सरचिटणीस नरेश देसाई, महिला जिल्हाध्यक्षा संजना जगदाळे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे शफिक शेख, विजय बोबडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख, रजनी पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक नितीन बानगुडे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी उमेदवारांची जुळवाजुळव करत भाजपपुढे आव्हान निर्माण केले आहे. सातारा शहरावासीय अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहेत. अद्याप येथील नागरिकांना मुलभूत सुविधाही मिळाल्या नाहीत. अनेक प्रश्न प्रलंबित असून शहराला समस्यामुक्त करण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्यावी. ठेकेदार धार्जिण्यांना संधी द्यायची की सामान्य कुटुंबातील उमेदवारांना संधी द्यायची याचा निर्णय सुज्ञ सातारकर नक्कीच घेतील. -आ. शशिकांत शिंदे (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदच्ंद्र पवार पक्ष)