#AUSAvIND : फलंदाजांनी गमावले, गोलंदाजांनी कमावले

बुमराहचे दमदार नाबाद अर्धशतक, शमी व सैनीचे 3 बळी
सिडनी – ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या तीन दिवसीय सराव सामन्यात जसप्रीत बुमराहने फलंदाजीत कमाल करताना नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. इतकेच नव्हे तर त्याने महंमद शमी, नवदीप सैनी व महंमद सिराजच्या साथीत भेदक गोलंदाजी करत यजमान ऑस्ट्रेलियाच्या अ संघाच्या फलंदाजीचीही वाताहत केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा यजमानांचा पहिला डाव 108 धावांत संपला. बुमराहच्या खेळीने भारताने पहिल्या डावात सर्वबाद 194 धावांपर्यंत मजल मारली. भारताला 86 धावांची आघाडी मिळाली. अचानक आलेल्या पावसामुळे दिवसातील जवळपास सहा षटकांचा खेळ वाया गेला.
भारताचा वेगवान गोलंदाज बुमराहने फलंदाजीसह गोलंदाजीतही वर्चस्व राखले. त्याने अव्वल फलंदाज जो बर्न्सला बाद करत त्यांच्या डावाला सुरूवातीलाच खिंडार पाडले. त्यानंतर बॅकफुटवर गेलेल्या यजमान संघाला शमी व सिराजने सतावले. मार्कस हॅरीस, बेन मॅक्डरमॉट व सिन अबॉट यांना बाद केले. तर दुसऱ्या बाजूने सिराजने निक मेडीसनला बाद करत त्यांची अवस्था 5 बाद 56 अशी बिकट केली. कर्णधार अलेक्स कॅरीने एक बाजू सांभाळली होती. मात्र, जॅक वाईल्डरमाऊथनेही निराशा केली.
त्यानंतरच्या फलंदाजांनाही भारतीय गोलंदाजीचा सामना करता आला नाही. नवोदीत नवदीप सैनीने अचुक गोलंदाजी करत तीन गडी बाद केले. यजमान संघाचा कर्णधार अलेक्स केरीने सर्वाधिक 32 धावा केल्या. भारताकडून शमी व सैनी यांनी प्रत्येकी 3 तर, बुमराहने 2 गडी बाद केले. सिराजने एक बळी घेतला. पॅट्रीक रोव 7 धावांवर नाबाद राहिला. हॅरीस कॉनवे 7 धावावंर धावबाद झाल्यावर पहिल्या दिवसाचा केळ थांबला. त्यांचा निम्मा संघ केवळ 30 धावांत तंबूत परतला.
तत्पूर्वी, पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यापूर्वी यजमान ऑस्ट्रेलियाच्या अ संघाविरुद्धच्या शुक्रवारपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या सराव सामव्यात भारतीय संघाने अत्यंत बेजबाबदार फलंदाजी केली. तळात फलंदाजीला येत नाबाद अर्धशतकी खेळी करणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या खेळीमुळे संघाची थोडीफार प्रतिष्ठा जपली गेली. या सामन्यात भारताचा पहिला डाव केवळ 49 व्या षटकांत 194 धावांवर अटोपला.
माघारीमुळे कोहलीवर टीका ..
यंदाच्या मोसमात फारसा यशस्वी न ठरलेला भारताचा कर्णधार विराट कोहलीने या सराव सामन्यातून अंग काढून घेतल्याने त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी दिवस-रात्र सराव सामन्यात खेळण्याचा लाभ होणार असतानाही त्याने सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांनी त्याच्यावर टीका केली आह. मुळातच यंदा भरात नसलेल्या कोहलीसाठी हा सामना कसोटी मालिकेपूर्वी सरावाची संधी होती. मात्र, त्याच्या माघारीमुळे प्रत्यक्ष कसोटी मालिकेत तो कशी कामगिरी करणार यावरही प्रश्नचिन्क निर्माण झाले आहे.
नियमित कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजाराच्या अनुपस्थितीत नेतृत्व करत असलेल्या अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर मयंक आग्रवाल केवळ 2 धावा काढून बाद झाल्यानंतर पृथ्वी शॉ व शुभमन गील यांनी 63 धावांची बहुमोल भागीदारी केली. ही जोडी स्थिरावणारप असे वाटत असतानाच शॉ बाद झाला. त्यानंतर आलेल्या हनुमा विहारीच्या साथीत गीलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, विहारीनेही निराशा केली. मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताची घसरगुंडी उडाली. त्यावेळी भारताच्या 9 बाद 123 धावा झाल्या होत्या. त्याचवेळी जसप्रीत बुमराहने जबाबदारीने फलंदाजी करताना चांगली लढत दिली. त्याने नाबाद अर्धशतकी खेळी करताना महंमद सिराजच्या साथीत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली.
विहारी, गिल, कर्णधार रहाणे, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, नवदीप सैनी हे पाठोपाठ बाद झाले. 3 बाद 102 वरुन 9 बाद 123 अशी भारताची अवस्था बनली होती. मात्र, बुमराह व सिराज यांनी अखेरच्या गड्यासाठी 71 धावांची भागीदारी केली. बुमराहने 57 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 55 धावा केल्या. सिराजने 34 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावताना 22 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर भारताचा पहिला डाव 194 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाकडून सिन अबॉट व जॅक वाईल्डरमथने प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर, हॅरी कॉनवे, विल्यमस सदरलॅंड, कॅमेरून ग्रीन व मिचेल स्वेपसन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक – भारत पहिला डाव – 48.3 षटकांत सर्वबाद 194 धावा. (शुभमन गील 43, पृथ्वी शॉ 40, जसप्रीत बुमराह नाबाद 55, महंमद सिराज 22, जॅक वाइल्डरमाऊथ 3-13, सिन अबॉट 3-46). ऑस्ट्रेलिया अ पहिला डाव – 32.2 षटकांत सर्वबाद 108 धावा. अलेक्स केरी 32, मार्कस हॅरीस 26, नवदीप सैनी 3-19, महंमद शमी 3-29, जसप्रीत बुमराह 2-33, महंमद सिराज 1-26).





