पुणे -संरक्षण विभागाच्या कोणत्याही आस्थापनेपासून 50 मीटर अंतरापर्यंत बांधकाम करण्यास मनाई करणार आदेश संरक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे पुण्यातील अनेक बांधकामांना त्याचा फटका बसला होता. त्यामुळे महापालिका आणि संरक्षण विभागात वादही सुरू झाले होते. मात्र, अखेर संरक्षण विभागाने या आदेशाला स्थगिती दिली आहे. परिणामी, या भागातील बांधकामे पुन्हा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी काही ठराविक लष्करी आस्थापनांपासून 100 ते 500 मीटरपर्यंतच बांधकामास बंदी होती. सन 2011 मध्ये संरक्षण विभागाच्या कार्यालयांपासून 100 मीटरपर्यंत बांधकामांवर बंदी घालण्यात आली. 100 ते 500 मीटरपर्यंतच्या परिसरात तळमजला व तीन मजली बांधकामास परवानगी देण्यात आली. त्यासाठी संरक्षण विभागाचे “ना हरकत’ प्रमाणपत्र अनिवार्य केले. 2016 मध्ये या नियमांत सुधारणा करण्यात आली. 100 मीटरऐवजी 10 मीटरपर्यंत नव्याने बांधकाम करता येणार नाही असा नियम करून त्यात शिथिलता आणण्यात आली. पण सप्टेंबर 2022 मध्ये संरक्षण विभागाच्या सर्व आस्थापनांपासून 100 मीटर परिसरात बांधकामांना बंदी घालण्यात आली. मात्र, याबाबत अधिसूचना नसल्याने महापालिकेने हा आदेश पाळण्यास साफ शब्दांत नकार दिला होता. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये संरक्षण विभागाने सुधारित आदेश काढत पूर्वीचे आदेश रद्द करत सरसकट सर्व आस्थापनांपासून 50 मीटरपर्यंत बांधकाम करण्यास बंदी घालण्याचे आदेश संरक्षण विभागाच्या चीफ आर्मी स्टाफला देण्यात आले. त्यामुळे महापालिकेनेही या बांधकामांना स्थगिती दिली होती. मात्र, आता संरक्षण विभागानेच आपले नव्या आदेशांना स्थगिती दिली आहे. दरम्यान, याबाबत महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. पुण्यातील या भागाला होणार फायदा पुणे शहरातील औंध, खडकी, खडकवासला, डंकर्क लाइन (नगर रस्ता), मांजरी यासह पिंपरी, तळेगाव, लोणावळा आयएनएस शिवाजी परिसराच्या हद्दीलगतच्या बांधकामांना फटका बसला होता. त्यामध्ये शेकडो हेक्टर जमिनीवरील बांधकामांना बंदी आल्याने त्याचा मोठा फटका बसला होता. मात्र, आदेशाला स्थगिती मिळाल्याने या भागातील बांधकामांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.