भाजपकडून पक्षासोबत बंडखोरी करणाऱ्या ‘त्या’ आमदारासह 14 पदाधिकाऱ्यांचे निलंबन रद्द

गोंदिया : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी 2019 मध्ये भाजपकडून तिकीट न मिळाल्याने भाजपासोबत बंडखोरी केली होती. तसेच त्यांनी त्यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि त्यात त्यांचा विजयही झाला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर पक्षाशी बंडखोरी केल्याचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन केलं होतं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे निलंबन मागे घेतले आहे.
विनोद अग्रवाल यांच्यासह अन्य 14 पदाधिकाऱ्यांचे ही निलंबन रद्द
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आता चांगलाच तयारीला लागल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचा भाजप पक्षातील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात आली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यावेळी त्यांना भाजपने उमेदवारी नाकारली होती.
दरम्यान, भाजपची उमेदवारी न मिळाल्याने विनोद अग्रवाल यांना अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यात त्यांनी विजय देखील मिळवला होता. मात्र, पक्षाशी बंडखोरी केल्याचा ठपका ठेवत पक्षाने त्यांचे निलंबन केलं होतं. अशातच आता विनोद अग्रवाल यांचा निलंबन रद्द करण्यात आले आहे. तसेच 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल असतील यावरही जवळ जवळ शिक्कमोर्तब झाला आहे.





