डेमोक्रॅटिक पक्षाच्या 2 खासदारांची हत्या करणाऱ्या संशयिताचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

बेली प्लेन (अमेरिका) : मिनेसोटा येथील डेमोक्रॅटिक पक्षाच्या 2 खासदारांची हत्या करणाऱ्या संशयिताने काल पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. घराजवळच्या जंगलामध्ये त्याला बघितले गेल्यानंतर या संशयिताने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण प्रांतात या संशयिताचा कसून शोध घेतला जात होता.
वान्स बोल्टर असे या संशयित हल्लेखोराचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर दोन हत्या आणि दोन हत्यांचे प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याने पोलिसांच्या वेशभुषेमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या माजी खासदार मेलिसा होर्टमन यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला होता. मेलिसा यांच्याबरोबर त्यांचे पती मार्क यांच्यावर देखील गोळीबार करण्यात आला होता.
मेलिसा यांचा लगेच मृत्यू झाला, तर मार्क यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मेनियापोलिसच्या उपनगरामध्ये शनिवारी सकाळी ही घटना घडली होती. तेथून 9 किलोमीटर लांब असलेल्या सिनेटर जॉन हॉफमन यांच्या घरात घुसून बोल्टर याने हॉफमन आणि त्यांच्या पत्नी वेट यांच्यावर देखील गोळ्या झाडल्या होत्या. ते दोघेही गंभीर जखमी झाले होते.
या घटनेनंतर पोलिसांच्या गणवेशातील बोल्टर याचा कसून शोध सुरू झाला होता. ब्रुकलेन पार्कच्या परिसरात तो असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे तपास सुरू केला. जंगलात असलेल्या बोल्टरने पोलिसांना बघितले आणि आत्मसमर्पण केले. डेमोक्रॅटिक खासदारांवर प्राणघातक हल्ला करण्यामागील त्याचा हेतू स्पष्ट झालेला नाही. यासंदर्भात पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
70 जणांची यादी
बोल्टर याच्या घरात तपास केला असता पोलिसांच्या वाहनासारखे दिसणारे वाहन आढळून आले. तसेच बोल्टर याने किमान ७० जणांची यादी तयार केल्याचेही आढळून आले आहे. या यादीमध्ये प्रांतीय आणि राष्ट्रीय पातळीवरीलप्रसिद्ध राजकीय व्यक्तींची नावे होती. यामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते, गर्भपाताच्या अधिकाराचे पुरस्कर्ते देखील आहेत. याशिवाय बोल्टर याने आरोग्य सुविधा केंद्रांची सविस्तर माहितीही गोळा केली होती, असेही आढळून आले आहे. बोल्टर हा पुर्वी मिनियापोलीस प्रांताच्या विकास मंडळावरील सदस्य होता, असेही स्पष्ट झाले आहे.





