Sushma Andhare : महाराष्ट्रात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक फोटो, व्हिडिओ आणि पीडित महिलांच्या तक्रारींनंतर खरात याला अटक करण्यात आली असून, या प्रकरणात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सातत्याने मोठे खुलासे करत पुरावे सादर केले आहेत. याच सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आता राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. तो आरोप म्हणजे #MeToo मोहिमेदरम्यान संगीतकार अनू मलिक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप आले असताना चाकणकर यांनी त्यांना क्लिन चीट दिल्याचा. सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत आणि माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली. त्या म्हणाल्या, “#MeToo अभियानात फिल्म इंडस्ट्रीतील दोन-तीन महिलांनी अनू मलिक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले होते. त्या महिलांनी तक्रार रुपाली चाकणकर यांच्याकडे केली होती. मात्र चाकणकर यांनी अनू मलिक यांना क्लिन चीट दिली.” Sushma Andhare का दिली क्लिन चीट? अंधारे यांनी यामागील कारण देखील उघड केले. त्या म्हणाल्या, “अनू मलिक यांच्या प्रॉडक्शनचा एक सिनेमा तयार झाला होता, ज्यात रुपाली चाकणकर यांच्या मुलाला सोहम चाकणकर यांना काम मिळाले होते. यामुळे चाकणकर यांनी महिलांना न्याय देण्याऐवजी अनू मलिक यांच्याशी डील केले. हे अत्यंत वाईट आहे.” सुषमा अंधारे यांनी यावेळी काही फोटो आणि लिंक्स देखील दाखवल्या. त्या म्हणाल्या, “तुम्ही अनू मलिक यांची केस गूगल करून बघा. माझ्याकडे ज्या लिंक्स आहेत त्या मी देते. या सगळ्यात सोहम चाकणकर, रुपाली चाकणकर आणि अनू मलिक दिसतील. तरीही रुपाली चाकणकर यांचे नाव रेकॉर्डवर येत नाही. हा फक्त एक महिलेचा प्रश्न नाही, यावर सखोल चौकशी झालीच पाहिजे.” अनू मलिक #MeToo प्रकरणाची पार्श्वभूमी #MeToo चळवळीत अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीतील अनेक महिलांनी पुढे येऊन विविध सेलिब्रिटींवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यामध्ये संगीतकार अनू मलिक यांच्यावरही अनेक महिलांनी आरोप केले होते, ज्यामुळे ते मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. सुषमा अंधारे यांच्या या आरोपांमुळे सध्या महाराष्ट्रात मोठी चर्चा रंगली आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आधीच रुपाली चाकणकर यांच्यावर विविध आरोप झाले असताना, आता अनू मलिक प्रकरणातील त्यांची भूमिका देखील प्रश्नांकित झाली आहे. अंधारे (Sushma Andhare) यांनी स्पष्ट केले की, महिलांना न्याय देण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्ती जर अशा प्रकारे स्वतःच्या फायद्यासाठी डील करत असतील, तर हे पूर्णपणे निंदनीय आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी देखील केली आहे.