Sushma Andhare : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना नागपूर विमानतळावर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सुषमा अंधारेंनी पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. त्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सीसीटीव्ही पाहून वस्तुस्थिती तपासावी, असे आवाहनही यावेळी केले. अंधारेंनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटले की, परभणी प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सभागृहात आणि बाहेर संघर्ष चालु आहे. अशातच आत्ता 3 वाजून 36 मिनिटांनी नागपूर विमानतळावर डिपार्चर गेटला विचित्र घटना घडली. मी, माझी 7 वर्षांची लेक आणि समता सैनिक दलाच्या ऍड. स्मिता कांबळे यांच्या समवेत होते. साधारण 6 फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला, समोरून अर्धे टक्कल असणारा माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता. नेहमी प्रमाणे कुणीतरी ओळखीचा असावा म्हणून वर बघितले तर तो जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. गेटवरील सुरक्षा रक्षक थोडे पुढें सरसावले तसा तो जय श्रीराम च्या घोषणा देत भरधाव गाडीने निघून गेला. देवेंद्र जी, आपण आपल्या यंत्रणेकडून या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती तपासावी. हा घटनाक्रम इथे लिहू नये असे खुपदा वाटले. मात्र दहशत आणि दबावतंत्राचे हे गलिच्छ राजकरण मुख्यमंत्री म्हणून आपल्यापर्यंत पोचवणे ही नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे असे वाटले, असेही त्या म्हणाल्या.